ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वढोलीत दीप महायज्ञ अन् तीन कुंडीय महायज्ञ उत्साहात संपन्न

चंद्रपूरच्या २५१ कुंडीय गायत्री महायज्ञाच्या यशस्वितेसाठी ग्रामस्थांचा सामूहिक साधनेचा संकल्प; व्यसनमुक्तीचा संदेश आणि त्रिवेणी वृक्षारोपणातून पर्यावरण संवर्धनाचा जागर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

गोंडपिपरी तालुक्यातील वढोली येथे धार्मिक आणि आध्यात्मिक वातावरणात दीप महायज्ञ व तीन कुंडीय गायत्री महायज्ञ उत्साहात संपन्न झाले. सोमवारी दीप महायज्ञ पार पडला, तर मंगळवारी तीन कुंडीय महायज्ञाचे भक्तिभावाने आयोजन करण्यात आले. या धार्मिक सोहळ्यामुळे संपूर्ण गावात चैतन्य आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. यावेळी गावातील पवित्र माती व तीर्थांचे विधिवत पूजन करण्यात आले.

चंद्रपूर येथे दि. ९ ते १२ जानेवारीदरम्यान आयोजित करण्यात येणारा भव्य २५१ कुंडीय गायत्री महायज्ञ यशस्वी व्हावा, यासाठी ग्रामस्थांनी सामूहिक साधना करण्याचा संकल्प केला. तसेच व्यसनमुक्ती संकल्प समारोहाच्या माध्यमातून समाजात व्यसनमुक्ती, सदाचार आणि संस्कारांचा संदेश देण्यात आला.

आगामी २५१ कुंडीय गायत्री महायज्ञात मोठ्या संख्येने सहभागी होण्यासाठी ग्रामस्थांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला.याप्रसंगी गायत्री परिवाराचे जिल्हा समन्वयक वासुदेव राठोड, गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष भाऊराव आभारे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत गायत्री महायज्ञाचे आध्यात्मिक महत्त्व, सामूहिक साधनेची शक्ती आणि समाजपरिवर्तनातील प्रत्येकाच्या सहभागाचे महत्त्व विशद केले.

या सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे वड, पिंपळ आणि कडुनिंब या त्रिवेणी वृक्षांचे पूजन करून गावातील सार्वजनिक ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. या वृक्षांचे संगोपन करण्याची जबाबदारी गुरुदेव सेवा मंडळासह विविध सामाजिक व धार्मिक संघटनांनी स्वीकारली. धर्म, संस्कार, व्यसनमुक्ती आणि पर्यावरण संवर्धन यांचा सुंदर संगम घडविणारा वढोलीतील हा उपक्रम समाजाला सकारात्मक दिशा देणारा ठरला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये