आक्सापूर प्रवासी थांब्यावर आढळला युवकाचा मृतदेह!
डोक्याला मार, रक्तबंबाळ अवस्थेत मृतदेह,मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट ; लातूरचा युवक बांधकाम क्षेत्रातील कयांस कंपनीच्या कामावरील मजूर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
गोंडपिपरी :_ आक्सापूर–चिंतलधाबा काँक्रीट रस्त्याचे काम करणाऱ्या कयांस कंपनीत कार्यरत असलेल्या लातूर जिल्ह्यातील अमोल बनसोड (वय ३५) या युवकाचा आक्सापूर येथील प्रवासी थांब्यावर २४ नोव्हेंबर दुपारी चार वाजता मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. डोक्याला मार लागलेल्या व रक्तबंबाळ अवस्थेतील त्यांचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली असून मृत्यूच्या कारणाबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
अमोल बनसोड हे कयांस कंपनीच्या कामावर बऱ्याच दिवसांपासून कार्यरत होते. काही वैयक्तिक कामानिमित्त ते आपल्या मूळ गावी लातूर येथे गेले होते. दोन दिवसांपूर्वीच ते पुन्हा कामावर रुजू होण्यासाठी परत आले होते. मात्र, आज आक्सापूर येथील प्रवासी थांब्यावर त्यांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली.
अमोल यांच्या डोक्याला मार लागल्याचे तसेच मृतदेह रक्तबंबाळ अवस्थेत असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. त्यामुळे हा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. कंपनीतील कामाच्या ठिकाणी काही घटना घडली होती का, की मृत्यूमागे अन्य काही कारण आहे, अशा विविध शंका उपस्थित होत असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची गरज व्यक्त होत आहे.
घटनेची माहिती कंपनीचे व्यवस्थापक पांडे यांनी कोठारी पोलीस स्टेशनला दिली आहे. कोठारीचे ठाणेदार दीपक काँक्रेडवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. शवविच्छेदन अहवाल आणि पोलीस तपासानंतरच अमोल बनसोड यांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
बाहेर गावाहून रोजगारासाठी आलेल्या युवकाचा अशा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याने कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.



