ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नायलॉन मांजाची निर्मिती, विक्री, साठवणूक व वापर करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई 

नायलॉन मांजा वापरणाऱ्यांना ५० हजार रुपये, तर विक्रेत्यांना २ लाख ५० हजार रुपयांपर्यंत दंड

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर :_ नायलॉन मांजामुळे दरवर्षी अनेक नागरिक जखमी होण्याबरोबरच काहींना आपला जीवही गमवावा लागतो. नायलॉन मांजामुळे मनुष्यांसह पशुपक्ष्यांच्या जीवितासही गंभीर धोका निर्माण होत असल्याने त्याच्या वापर, विक्री, साठवणूक व वाहतुकीवर प्रतिबंध घालण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर मा. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने SMPIL No. 9/2021 मधील आदेशानुसार नायलॉन मांजाचा वापर व विक्री करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

न्यायालयाच्या आदेशानुसार नायलॉन मांजाचा वापर करून पतंग उडविताना आढळून आल्यास संबंधित व्यक्तीस ५० हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. अल्पवयीन व्यक्ती नायलॉन मांजाचा वापर करताना आढळल्यास दंडाची रक्कम त्यांच्या पालकांकडून वसूल करण्यात येईल. तसेच नायलॉन मांजा विक्रीसाठी बाळगणे अथवा विक्री करताना आढळल्यास संबंधित विक्रेत्यास २ लाख ५० हजार रुपयांपर्यंत दंड आकारण्यात येणार आहे. नायलॉन मांजाची साठवणूक व वाहतूक करणाऱ्यांविरुद्धही नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे.

या अनुषंगाने चंद्रपूर शहर महानगरपालिका प्रशासनाने कार्यालयीन आदेश क्र. चंशमनपा/स्वच्छता विभाग/2026/3816, दिनांक 17/11/2026 अन्वये मनपाच्या तीन मुख्य झोनअंतर्गत प्रत्येकी एक याप्रमाणे तीन भरारी पथकांची स्थापना केली आहे. संबंधित झोनच्या सहायक आयुक्तांच्या नियंत्रणाखाली ही भरारी पथके कार्यरत राहणार आहेत. या पथकांमार्फत नायलॉन मांजाचा वापर, विक्री, साठवणूक व वाहतूक करणाऱ्यांची तपासणी करून संबंधितांवर कठोर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

नायलॉन मांजामुळे होणारे अपघात रोखणे, नागरिकांचे जीवित सुरक्षित ठेवणे तसेच पशुपक्ष्यांचे संरक्षण करणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. त्यामुळे नागरिकांनी नायलॉन मांजाचा वापर, खरेदी, विक्री अथवा साठवणूक करू नये. पतंग उडविण्यासाठी सुरक्षित पर्यायांचा वापर करावा आणि नायलॉन मांजामुक्त चंद्रपूर शहर निर्माण करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन चंद्रपूर शहर महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

नायलॉन मांजाला नकार द्या, सुरक्षित चंद्रपूर घडवा!

जनसंपर्क विभाग

चंद्रपूर शहर महानगरपालिका, चंद्रपूर

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये