कोरपणा तालुक्यातील २७ विहारांमध्ये वर्षावास ; तालुकास्तरीय समारोप उत्साहात
धम्मज्ञान परीक्षेत शीला निरंजने प्रथम; १०० उपासकांचा सहभाग

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
गडचांदूर : भारतीय बौद्ध महासभा तालुका कोरपणा यांच्या वतीने गडचांदूरसह तालुक्यातील २७ विहारांमध्ये आयोजित तीन महिन्यांच्या वर्षावासाचा तालुकास्तरीय समारोप सोहळा व धम्मज्ञान परीक्षा २४ नोव्हेंबर रोजी कार्तिक पौर्णिमेनिमित्त बुद्धभूमी, गडचांदूर येथे उत्साहात पार पडली.
वर्षावासादरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित ‘भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म’ या ग्रंथाचे वाचन, अध्ययन आणि धम्मप्रबोधनाचे कार्यक्रम घेण्यात आले. समारोपानिमित्त आयोजित धम्मज्ञान परीक्षेत तालुक्यातील १०० उपासक सहभागी झाले. परीक्षेत गडचांदूरच्या शीलाताई आसिल निरंजने यांनी प्रथम, कुरलीचे शंकर जीवने यांनी द्वितीय, तर हिरापूरच्या संजीवनी खाडे यांनी तृतीय क्रमांक पटकावला. विजेत्यांना अनुक्रमे ५ हजार, ३ हजार व २ हजार रुपये रोख पुरस्कार, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. सहभागी सर्व परीक्षार्थींनाही प्रमाणपत्र देण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटन आयु. किशोर तेलतुंबडे यांच्या हस्ते, तर अध्यक्षस्थान जिल्हाध्यक्ष आयु. श्रावण जीवने यांनी भूषविले. यावेळी मान्यवरांनी बुद्ध, धम्म आणि संघाचे विचार, प्रज्ञा, करुणा, समता व सामाजिक परिवर्तनाचे महत्त्व विशद केले. वर्षावासात सक्रिय सहभाग नोंदविणाऱ्या तालुक्यातील सर्व २७ विहारांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
भारतीय बौद्ध महासभेच्या या उपक्रमामुळे तालुक्यात धम्मशिक्षण व प्रबोधन चळवळीला व्यापक चालना मिळाली असून, दरवर्षी कार्तिक पौर्णिमेला तालुकास्तरीय वर्षावास समारोप आयोजित करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी महासभेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, बौद्धाचार्य व धम्मप्रेमी उपासक-उपासिकांनी परिश्रम घेतले.



