ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गावागावात आज संविधान मूल्यांचा जागर

राज्यातील ग्रामपंचायतींपासून जिल्हा परिषदांपर्यंत उद्देशिकेचे सामूहिक वाचन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

गोंडपिपरी :_ भारतीय लोकशाहीचा आत्मा असलेल्या संविधानातील मूल्ये, हक्क आणि नागरिकांची कर्तव्ये तळागाळातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविण्यासाठी आज गुरुवार, दिनांक २६ नोव्हेंबर २०२६ रोजी राज्यभरात ‘संविधान दिन’ (संविधान दिवस) मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. या निमित्ताने राज्यातील सर्व जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत स्तरावर विशेष उपक्रम राबविण्याचे आदेश पंचायत राज संचालनालयाने दिले आहेत.

भारत सरकारच्या पंचायती राज मंत्रालयाचे संयुक्त सचिव राजेश कुमार सिंह यांनी २० नोव्हेंबर रोजी देशातील सर्व राज्यांना यासंदर्भात निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्याचे पंचायत राज संचालक गिरीश भालेराव यांनी २३ नोव्हेंबर रोजी राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना परिपत्रक पाठवून संविधान दिन प्रभावीपणे साजरा करण्याचे आदेश जारी केले आहेत.

लोकशाही मूल्ये अधिक दृढ करण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी या ऐतिहासिक उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

*संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन*

 आज, २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ठीक ११.०० वाजता राज्यातील प्रत्येक जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत कार्यालय तसेच सार्वजनिक ठिकाणी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे (प्रास्ताविका) सामूहिक वाचन केले जाणार आहे.

*उद्देशिकेच्या प्रतींचे वितरण* कार्यक्रमापूर्वीच सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि ग्रामपंचायतींना Constitution75 Preambles Portal या अधिकृत संकेतस्थळावरून विविध भाषांमधील उद्देशिकेच्या डिजिटल व छापील प्रती वितरित केल्या जाणार आहेत.

 *वैचारिक आणि प्रबोधनात्मक उपक्रम*: संविधानाची ओळख नवीन पिढीला व्हावी, यासाठी व्याख्याने, चर्चासत्रे, वेबिनार, वादविवाद स्पर्धा आणि संविधान प्रश्नमंजुषा यांसारखे उपक्रम राबवले जाणार आहेत.

*डिजिटल मोहीम आणि व्यापक प्रसिद्धी:*

 नागरिक, विद्यार्थी, अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी ऑनलाइन ‘Read the Preamble’ मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा, तसेच या सर्व कार्यक्रमांना स्थानिक प्रसारमाध्यमे व समाजमाध्यमांवरून व्यापक प्रसिद्धी द्यावी, असे निर्देशही पत्राद्वारे देण्यात आले आहेत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये