संविधानाच्या रक्षणासाठी ब्रम्हपुरीत काँग्रेसची संविधान बचाव रॅली
संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन; डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार
ब्रम्हपुरी :- भारतीय संविधानाने देशाला दिलेली लोकशाही, समता, स्वातंत्र्य आणि बंधुतेची मूल्ये जपणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. संविधानाने दिलेले अधिकार आणि लोकशाही व्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी संविधानाचे संरक्षण व संवर्धन करणे काळाची गरज आहे. याच उद्देशाने संविधान दिनानिमित्त ब्रह्मपुरी येथे काँग्रेस कमिटीच्या वतीने शहरात संविधान बचाव रॅली काढण्यात आली.
या रॅलची सुरुवात ब्रह्मपुरी शहरातील तालुका काँग्रेस कार्यालयातून झाली. यावेळी सर्वप्रथम संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर काँग्रेस कार्यालयापासून गुजरी वॉर्ड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत संविधान बचाव रॅली काढण्यात आली. रॅलीच्या समारोपप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
या रॅलीत तालुका व शहर काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी, नगरपरिषदेचे पदाधिकारी, काँग्रेस पक्षाच्या विविध फ्रंटल ऑर्गनायझेशन व सेलचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच संविधानप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
संविधानाचे महत्त्व, लोकशाही मूल्यांचे जतन आणि संविधानाने प्रत्येक नागरिकाला दिलेल्या मूलभूत अधिकारांबाबत जनजागृती करण्यात आली. संविधानाचे रक्षण करणे म्हणजे देशातील लोकशाही, सामाजिक न्याय आणि समतेची परंपरा अधिक बळकट करणे, असा संदेश या रॅलीच्या माध्यमातून देण्यात आला.



