ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार, महिला व सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी गडचिरोली ते नागपूर १७५ किलोमीटरचा पायी मोर्चा; चंद्रपूर जिल्ह्यातील विविध प्रश्नही शासनदरबारी मांडणार

जिल्ह्यातील जनतेने मोठ्या संख्येने पायी मोर्चात सहभागी व्हावे ; महेंद्र ब्राह्मणवाडे यांचे आवाहन

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर :_ शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार युवक, महिला आणि सर्वसामान्य नागरिकांच्या विविध प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी संघर्ष कृती समिती व काँग्रेस पक्षाच्या वतीने १ ते ८ डिसेंबरदरम्यान गडचिरोली ते नागपूर विधानभवन असा १७५ किलोमीटरचा पायी मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. या मोर्चात चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांनीही मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या हक्कांसाठी आवाज बुलंद करावा, असे आवाहन काँग्रेस नेते महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केले आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी आज दुष्काळी परिस्थिती, शेतीचे वाढते खर्च, पिकांचे नुकसान, वन्यप्राण्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे होणारी जीवितहानी, सिंचनाच्या अपुऱ्या सुविधा आणि बेरोजगारी अशा अनेक समस्यांना सामोरे जात आहेत. या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी आयोजित मोर्चात चंद्रपूर जिल्ह्यातील मागण्याही प्राधान्याने मांडण्यात येणार आहेत.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी कर्जमाफी, धानाला योग्य भाव व बोनस, नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पीक नुकसानीची तातडीने भरपाई, दुष्काळग्रस्त भागांना विशेष मदत आणि शेतीसाठी अखंडित वीजपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी करण्यात येणार आहे. तसेच गोसेखुर्द कालव्याच्या विस्तारीकरणाचे काम तातडीने पूर्ण करून अधिकाधिक गावांतील शेतजमिनींना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणीही मोर्चाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.

चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत वाघ आणि रानटी हत्तींच्या हल्ल्यांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांमुळे जीव गमावणाऱ्या नागरिकांच्या कुटुंबीयांना योग्य आर्थिक मदत द्यावी, कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी द्यावी, शेती व मालमत्तेच्या नुकसानीची भरपाई करावी आणि वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी करण्यात येणार आहे.

यासोबतच जिल्ह्यातील बेरोजगार युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, रिक्त शासकीय पदांची तातडीने भरती करावी, ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरुस्ती करावी, जड वाहतुकीमुळे होणाऱ्या अपघातांवर नियंत्रण आणावे, वनहक्क पट्टेधारकांचे प्रलंबित प्रश्न निकाली काढावेत आणि कमी पटसंख्येच्या नावाखाली जिल्हा परिषद शाळा बंद करू नयेत, अशा सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठीही मोर्चात आवाज उठविण्यात येणार आहे

हा मोर्चा कोणत्याही एका प्रश्नापुरता मर्यादित नसून शेतकरी, कष्टकरी, युवक, महिला, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हक्कांचा लढा आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांनी पक्षीय मतभेद बाजूला ठेवून आपल्या जिल्ह्यातील प्रश्नांसाठी एकजुटीने सहभागी व्हावे. व आपल्या न्याय्य मागण्यांना शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केले.

ब्रह्मपुरी, नागभीड, सावली, सिंदेवाही सह ब्रम्हपुरी व चिमूर विधानसभा क्षेत्रातील नागरिकांनी सहभागी व्हावे

२ डिसेंबर रोजी आरमोरी येथून निघणारी पदयात्रा ब्रह्मपुरीच्या दिशेने मार्गक्रमण करणार असून, गांगलवाडी फाटा येथे ब्रह्मपुरी तालुक्यातील नागरिकांना पदयात्रेत सहभागी होण्याची संधी आहे. ३ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता ब्रह्मपुरी येथून पदयात्रेला पुढील टप्प्यासाठी सुरुवात होणार असून, त्याच दिवशी नागभीड येथे मुक्काम राहणार आहे. ४ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता नागभीड येथून पदयात्रा पुढे रवाना होणार आहे.

या पदयात्रेत ब्रह्मपुरी व चिमूर विधानसभा क्षेत्रातील शेतकरी, युवक, महिला, कष्टकरी व सर्वसामान्य नागरिकांनी आपल्या सोयीच्या ठिकाणी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. शेतकरी, बेरोजगार आणि सर्वसामान्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी सुरू असलेल्या या लढ्याला एकजुटीने बळ द्यावे व आपल्या प्रश्नांचा आवाज शासनापर्यंत पोहोचवावा, असे आवाहन महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये