“ऑपरेशन बिबट”ला वेग..! ; डोंगराळ जंगलात वनविभागाची शोधमोहीम सुरू
किरमिरीत आठ दिवसांपासून बिबट्याचा मुक्काम? ; वनविभागासोबतच पोलिसांचीही संयुक्त मोहीम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
गोंडपिपरी तालुक्यातील धाबा वनपरिक्षेत्र आणि लगतच्या गावांमध्ये बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. किरमिरी गावालगत असलेल्या झुडपी जंगलात मागील आठ दिवसांपासून बिबट्याचा वावर असल्याची माहिती समोर आली असून, परिसरात त्याने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. आठवडाभरात बिबट्याने चार बकऱ्यांचा फडशा पाडल्याने शेतकरी व पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. विशेष म्हणजे हा बिबट्या मादी असून तिच्यासोबत पिल्ले असल्याचे सांगितले जात असल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे.
किरमिरी परिसरातील झुडपी रानात मागील वीस वर्षांपूर्वी जमीन खोदल्याने निर्माण झालेल्या मोठमोठ्या खोल दऱ्यांमध्ये बिबट्याने आसरा घेतल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे. या परिसरात बिबट्याचा मुक्काम असल्याने शेतशिवारात जाणाऱ्या शेतकरी, शेतमजूर आणि गुराख्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
बिबट्याचा ठावठिकाणा शोधून त्याचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभागाकडून प्रभावी मोहीम राबविण्यात येत आहे. वनविभाग, पोलीस विभाग आणि ग्रामस्थांच्या मदतीने ही मोहीम राबविली जात आहे. “ऑपरेशन बिबट”च्या माध्यमातून डोंगराळ जंगल पिंजून काढत बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश येते का, याकडे आता संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.
*आठवडाभरात चार बकऱ्यांचा बळी*
किरमिरी परिसरात दबा धरून बसलेल्या बिबट्याने मागील काही दिवसांत चार बकऱ्यांचा जीव घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पशुपालकांचे मोठे नुकसान झाले असून, बिबट्याच्या दहशतीमुळे नागरिकांनी घराबाहेर पडतानाही सावधगिरी बाळगण्यास सुरुवात केली आहे. शेतकरी, शेतमजुरांनी जंगलालगतच्या शेतावर जाणे बंद केले आहे. बिबट्या या परिसरात ठाण मांडून असल्याने एखाद्या क्षणी मानवी जीविताला धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.
*डोंगराळ जंगलात “ऑपरेशन बिबट”, पथक तैनात*
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन वनविभागाने बिबट्याच्या बंदोबस्तासाठी “ऑपरेशन बिबट” सुरू केले आहे. डोंगराळ भाग, झुडपी जंगल आणि बिबट्याला लपण्यासाठी पोषक असलेल्या परिसरात वनविभागाचे पथक तैनात करण्यात आले असून शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. बिबट्याच्या हालचालींचा मागोवा घेण्यासाठी जंगल परिसराची पाहणी केली जात आहे.
बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरे व कॅमेरे बसविण्यासह प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची मदत घेण्यात येत आहे. नागरिकांनी बिबट्याचा पाठलाग करू नये किंवा गर्दी करून त्याला घेरण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे.



