ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

‘प्रवाशांच्या सेवेसाठी’चा दावा फोल बसस्थानकाची दुरवस्था कायम

तातडीने सुधारणा न झाल्यास आंदोलनाचा इशारा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

 भद्रावती शहरातील एसटी बसस्थानकाची दुरवस्था कायम असून, आवारात सर्वत्र खड्डे, अस्वच्छता, अपुरी पार्किंग व्यवस्था आणि मूलभूत सुविधांचा अभाव दिसून येत आहे. शुद्ध पिण्याचे पाणी, स्वच्छ शौचालये, पुरेसा वीजपुरवठा यांसारख्या सुविधांची कमतरता असल्याने महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.

विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी प्रादेशिक व्यवस्थापकांनी बसस्थानकाची पाहणी व मूल्यांकन केले होते. मात्र, त्यानंतरही परिस्थितीत अपेक्षित सुधारणा झालेली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.

दरम्यान, आठ दिवसांपूर्वी भद्रावतीहून नागपूरकडे जाणाऱ्या बसमधून हेडलाईटची समस्या असल्याचे कारण देत सुमारे २० प्रवाशांना खाली उतरविण्यात आल्याची घटना घडली. याबाबत ज्येष्ठ पत्रकार दिलीप मांढरे यांनी जाब विचारला असता त्यांना उर्मट भाषेत उत्तर देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

बसस्थानकाच्या दुरवस्थेबाबत राजकीय व सामाजिक संघटनांसह प्रवासी ऑटोचालक संघटनेनेही नाराजी व्यक्त केली असून, तातडीने सुधारणा न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.

खड्डेमुक्त परिसर, स्वच्छता, शुद्ध पाणी, पुरेसा वीजपुरवठा, पार्किंग तसेच ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी होत आहे.

‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीदवाक्य केवळ भिंतीवर न राहता प्रत्यक्ष सेवेत दिसावे, अशी भद्रावतीकरांची अपेक्षा आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये