ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भद्रावती शहरात विविध ठिकाणी स्वातंत्र्य दिवस साजरा

महात्मा गांधींच्या पुतळ्याला साधा हारही नाही : प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

       स्वातंत्र्य दिनानिमित्त चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती शहरातील विविध शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये व संस्थांमध्ये उत्साहात ध्वजारोहण झाले. मात्र, भाजी मंडई परिसरातील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला प्रशासनाकडून साधा हारही अर्पण करण्यात आला नसल्याचे दुर्दैवी चित्र दिसून आले.

ही बाब निदर्शनास आल्यानंतर जय जगन्नाथ महाराज सेवानिवृत्त मित्र मंडळ, गवराळा यांच्या सदस्यांच्या उपस्थितीत चौकातील हमालीचे काम करणाऱ्या श्रमजीवींना सोबत घेऊन सकाळी ८.४५ वाजता गांधींच्या पुतळ्यास हार अर्पण करण्यात आला. दिवसाचे महत्त्व ओळखून शेजारील हार विक्रेत्यानेही हार उपलब्ध करून दिला. त्यानंतर फेयरी लँड स्कूलच्या वतीने सकाळी १० वाजल्यानंतर माल्यार्पण करण्यात आले. मात्र, संबंधित प्रशासकीय यंत्रणेने याकडे कानाडोळा केल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

एकीकडे स्वातंत्र्य दिनाचे कार्यक्रम उत्साहात साजरे होत असताना राष्ट्रपित्याच्या पुतळ्याला साधा हारही अर्पण न होणे, ही बाब प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरली आहे.

दरम्यान, नगर परिषद येथील ५१ फूट उंच ध्वजस्तंभावर खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. नगर परिषद येथे नगराध्यक्ष प्रफुल चटकी, तहसील कार्यालयात प्रभारी तहसीलदार मधुकर काळे, पंचायत समितीत संवर्ग विकास अधिकारी आशुतोष सपकाळ, पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक योगेश्वर पारधी, तर ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मनीष सिंह यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले. विविध शाळा, महाविद्यालये, संस्था तसेच हुतात्मा स्मारक येथेही स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये