गोंडपिपरी पोलिस ठाण्यात रक्तदानाचा महायज्ञ; १०१ रक्तदात्यांनी दिले योगदान
स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून पोलिसांचा स्तुत्य उपक्रम ; जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या रक्तपेढी पथकाचे सहकार्य

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून गोंडपिपरी पोलिस ठाण्याच्या वतीने शनिवारी (१५ ऑगस्ट) भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत झालेल्या या शिबिराला नागरिक, पोलिस अधिकारी-कर्मचारी तसेच विविध घटकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात तब्बल १०१ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.
जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर येथील डॉ. अनिल बिश्नोई यांचे नेतृत्वातील रक्तपेढी पथकाच्या सहकार्याने हे रक्तदान शिबिर घेण्यात आले. रक्तपेढी पथकाने नियोजनबद्ध पद्धतीने रक्तसंकलन केले. पोलिस ठाणे गोंडपिपरी तसेच गोंडपिपरी शहर व पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने शिबिरात सहभागी होत रक्तदान केल्याची माहिती ठाणेदार रमेश हत्तीगोटे यांनी दिली.
रक्ताची गरज भासणाऱ्या रुग्णांसाठी रक्तदान हे अत्यंत महत्त्वाचे ठरते. अपघातग्रस्त, शस्त्रक्रिया होणारे रुग्ण तसेच विविध आजारांनी उपचार घेत असलेल्या रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध होणे गरजेचे असते. ही गरज लक्षात घेऊन पोलिस विभागाने सामाजिक उपक्रमातून रक्तदानाला चालना देण्याचा प्रयत्न केला.
शिबिरादरम्यान रक्तदात्यांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळाला. पोलिस अधिकारी-कर्मचारी आणि नागरिकांनी एकत्रितपणे रक्तदान करत समाजाप्रती असलेली जबाबदारी अधोरेखित केली. ‘रक्तदान हेच जीवनदान’ या भावनेतून झालेल्या या उपक्रमामुळे गोंडपिपरी पोलिसांच्या सामाजिक कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर देशसेवेबरोबरच समाजसेवेचा संदेश देणाऱ्या या उपक्रमात १०१ रक्तदात्यांनी सहभाग नोंदविला. या रक्तदानात गरजू रुग्णांना जीवनदान मिळण्यास मदत होणार असून, भविष्यातही अशा सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.



