ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

तिरंगा बाईक रॅलीत आ. किशोर जोरगेवार स्वतः बाईक चालवत सहभागी

देशभक्तीच्या घोषणांनी दुमदुमले चंद्रपूर ; भाजप महानगरच्या तिरंगा बाईक रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर :_ स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून भारतीय जनता पार्टी, चंद्रपूर महानगरच्या वतीने आयोजित करण्यात आलेली भव्य तिरंगा बाईक रॅली शनिवारी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. या रॅलीत आमदार किशोर जोरगेवार यांनी स्वतः बाईक चालवत सहभाग नोंदविला. त्यांच्या या सहभागामुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला.

छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून सकाळी १० वाजता रॅलीला सुरुवात झाली. आमदार जोरगेवार यांनी स्वतः बाईक चालवत रॅलीचे नेतृत्व केले. भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि देशप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने दुचाकींवर तिरंगा ध्वज घेऊन रॅलीत सहभागी झाले होते. ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’ अशा देशभक्तीपर घोषणांनी शहरातील प्रमुख मार्ग दुमदुमून गेले.

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना आ. किशोर जोरगेवार म्हणाले की, तिरंगा हा केवळ आपल्या देशाचा ध्वज नाही, तर तो देशाच्या स्वाभिमानाचे, त्यागाचे आणि एकतेचे प्रतीक आहे. स्वातंत्र्यसैनिकांनी दिलेल्या बलिदानामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळाले असून, राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य देणे हीच त्यांच्याप्रती खरी आदरांजली आहे. प्रत्येक नागरिकाने देशाच्या प्रगतीसाठी आपले योगदान देत राष्ट्र प्रथम या भावनेने कार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

ते पुढे म्हणाले की, आजच्या तिरंगा बाईक रॅलीच्या माध्यमातून चंद्रपूर शहरात देशभक्तीची भावना अधिक दृढ करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. युवकांनी देशाच्या विकासात सक्रिय सहभाग घ्यावा आणि राष्ट्रीय एकात्मता, बंधुभाव व सामाजिक सलोखा कायम ठेवण्यासाठी पुढाकार घ्यावा. तिरंगा प्रत्येक भारतीयाच्या मनात अभिमान आणि देशसेवेची प्रेरणा निर्माण करणारा आहे, असेही त्यांनी सांगितले.

रॅलीदरम्यान सामूहिक ‘वंदे मातरम्’ गायन करण्यात आले. राष्ट्रध्वजाचा सन्मान, देशभक्ती आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देत स्वातंत्र्यदिनाचा उत्साह साजरा करण्यात आला.

छत्रपती शिवाजी महाराज चौक, गांधी चौक, जटपुरा गेट, प्रियदर्शिनी चौक, वरोरा नाका, जनता कॉलेज, वाहतूक कार्यालय, एसटी वर्कशॉप चौक, रामनगर पोलीस स्टेशन चौक, बंगाली कॅम्प चौक मार्गे रॅली गिरणार चौक येथे पोहोचली. भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगरच्या वतीने आयोजित या तिरंगा बाईक रॅलीला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा चंद्रपूरकरांच्या राष्ट्रभक्तीची प्रचिती देणारा ठरला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये