विधवा महिलांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनाचे ध्वजारोहण
पोडसा ग्रामपंचायतीचा स्त्री-सन्मानाचा आदर्श उपक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पोडसा ग्रामपंचायतीने यावर्षी सामाजिक संवेदनशीलता, महिला सन्मान आणि समानतेचा अनोखा संदेश देत दोन विधवा महिलांना ध्वजारोहणाचा मान देऊन समाजासमोर आदर्श निर्माण केला.
पोडसा ग्रामपंचायत कार्यालयातील स्वातंत्र्यदिनाचे ध्वजारोहण आशा सुधाकर अलगमकार यांच्या हस्ते करण्यात आले तर गावातील मुख्य चौकातील ध्वजारोहणाचा मान ताईबाई घनश्याम एलमुले यांना देण्यात आला. या दोन्ही महिलांना ग्रामपंचायतीच्या वतीने विशेष सन्मान देत तिरंगा ध्वजारोहणाचा मान देण्यात आला.
ग्रामपंचायतीचे प्रशासक देवीदास पांडुरंग सातपुते यांच्या पुढाकारातून हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. विधवा महिला या समाजाचा अविभाज्य घटक असून, त्यांच्या वैवाहिक परिस्थितीमुळे त्यांच्या सन्मानात कोणतीही कमतरता राहता कामा नये, या सामाजिक जाणिवेतून दोन्ही महिलांना स्वातंत्र्यदिनाच्या पवित्र दिवशी ध्वजारोहणाचा मान देण्यात आला.
“विधवा महिलांकडे सहानुभूतीने पाहण्यापेक्षा त्यांना सन्मानाने आणि समानतेने वागविणे गरजेचे आहे. तिरंगा फडकविण्याचा मान हा प्रत्येक भारतीय नागरिकासाठी अभिमानाचा क्षण आहे. त्यामुळे दोन विधवा महिलांच्या हस्ते ध्वजारोहण करून त्यांचा आत्मविश्वास व मनोबल वाढविणे, तसेच समाजामध्ये समानतेचा संदेश देणे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे,” अशी भावना सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष तथा प्रशासक ग्रामपंचायत देवीदास सातपुते यांनी व्यक्त केली.



