सामाजिक बांधिलकीचा नवा आदर्श!
चिमुकल्या विद्यार्थ्यांसाठी आस्वले पेट्रोलियमकडून शुद्ध आणि थंड पाण्याची सोय
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून जि. प. उच्च प्राथमिक शाळा लखमापूरला ‘वॉटर फिल्टर व कुलिंग मशीन’ची भेट
लखमापूर येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी आणि त्यांना नेहमी शुद्ध व थंड पाणी मिळावे, या उदात्त हेतूने आस्वले पेट्रोलियम आणि शिवसाई कोटेक्सचे संचालक श्री. मोरेश्वर भाऊ दादाजी आस्वले यांनी शाळेला ‘शुद्ध आरओ (RO) वॉटर फिल्टर आणि वॉटर कुलिंग मशीन’ सप्रेम भेट दिली आहे. आज, १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून या वॉटर फिल्टर मशीनचे दिमाखदार उद्घाटन करण्यात आले. या आगळ्या-वेगळ्या उपक्रमाने यंदाचा स्वातंत्र्य दिन लखमापूर शाळेसाठी अत्यंत संस्मरणीय ठरला.
लखमापूर येथील जि. प. उच्च प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या चिमुकल्या विद्यार्थ्यांना शुद्ध व थंड पिण्याच्या पाण्याची मोठी आवश्यकता होती. ही विद्यार्थ्यांची गरज ओळखून, सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून आस्वले पेट्रोलियम अँड शिवसाई कोटेक्सचे संचालक मोरेश्वर भाऊ अस्वले यांनी तत्परतेने पुढाकार घेतला. शाळेतील विद्यार्थ्यांची तहान भागवण्यासाठी त्यांनी तातडीने हे अद्ययावत मशीन उपलब्ध करून दिले.
स्वातंत्र्य दिनाच्या मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमानंतर या वॉटर फिल्टर आणि कुलिंग मशीनचा उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला. या उद्घाटन प्रसंगी लखमापूर ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, गावचे पोलीस पाटील, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व उपाध्यक्ष, तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते. यासोबतच शाळेचे माजी विद्यार्थी संघ, गावातील सर्व ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामस्थांनीही या कार्यक्रमाला मोठी उपस्थिती दर्शवली.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक विनोद नामदेवराव क्षीरसागर आणि सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने टाकलेल्या या महत्त्वपूर्ण पावलाबद्दल सर्व शिक्षक वृंद आणि ग्रामस्थांनी देणगीदार मोरेश्वर भाऊ अस्वले यांचे मनःपूर्वक आभार मानले. विद्यार्थ्यांना आता शाळेतच थंड आणि शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरही मोठा आनंद पाहायला मिळाला. पुन्हा एकदा शाळेकडून खूप खूप आभार धन्यवाद.



