वृक्षारोपण संवर्धन कार्यक्रम उत्साहात संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
जिवती :- येथील दल्लूजी पाटील उसेंडी महाविद्यालय, जिवती, जि. चंद्रपूर येथील राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागाच्या वतीने ‘वृक्षारोपण संवर्धन कार्यक्रम’ तसेच ‘एक पेड माँ के नाम’ हा पर्यावरणपूरक उपक्रम उत्साहात संपन्न झाला.
पर्यावरण संवर्धन, जैवविविधतेचे संरक्षण आणि विद्यार्थ्यांमध्ये वृक्षसंवर्धनाची जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने महाविद्यालय परिसरात विविध प्रजातींच्या रोपांची लागवड करण्यात आली. ‘एक पेड माँ के नाम’ या संकल्पनेतून विद्यार्थ्यांनी आपल्या आईच्या सन्मानार्थ एक वृक्ष लावून त्याचे संगोपन व संरक्षण करण्याचा संकल्प केला.
महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. एस. एच. शाक्य यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमास प्राध्यापक, एनएसएस स्वयंसेवक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विदर्भ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयाचे एनएसएस कार्यक्रम अधिकारी डॉ. सचिन ग. यनगंदलवार यांची विशेष उपस्थिती लाभली. यावेळी त्यांनी वृक्षांचे पर्यावरणीय महत्त्व, जैवविविधता संवर्धन आणि भावी पिढ्यांसाठी हरित परिसर निर्माण करण्याची गरज अधोरेखित केली.
वृक्षारोपणापुरता उपक्रम मर्यादित न ठेवता लावलेल्या रोपांना नियमित पाणी देणे, त्यांचे संरक्षण व संगोपन करणे तसेच त्यांच्या वाढीची जबाबदारी स्वीकारण्याचा निर्धार विद्यार्थ्यांनी केला. ‘एक विद्यार्थी – एक वृक्ष’ या संकल्पनेतून पर्यावरण संवर्धनाची चळवळ अधिक व्यापक करण्याचा संदेश यावेळी देण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी एनएसएस कार्यक्रम अधिकारी डॉ. मुरलीधर जाधव तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, एनएसएस स्वयंसेवक व विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. या उपक्रमामुळे महाविद्यालय परिसर अधिक हिरवागार व पर्यावरणपूरक करण्याच्या प्रयत्नांना मोठी चालना मिळाली.
‘एक पेड माँ के नाम – हरित भविष्यासाठी एक सुंदर पाऊल!’ या संदेशातून विद्यार्थ्यांनी पर्यावरण रक्षणाचा निर्धार व्यक्त केला.



