विदर्भ महाविद्यालयात भव्य तिरंगा रॅली
भारत माता की जय’च्या घोषणांनी दुमदुमला जिवती परिसर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
जिवती :-‘हर घर तिरंगा अभियान २०२६’ अंतर्गत विदर्भ कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स, जिवती येथील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रप्रेम, राष्ट्रीय एकात्मता आणि राष्ट्रध्वजाबद्दल आदराची भावना जागृत करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या रॅलीला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गजानन राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली आणि NSS समन्वयक डॉ. सचिन यनगंदलवार यांच्या नेतृत्वात रॅली काढण्यात आली. हातात तिरंगा ध्वज घेतलेल्या विद्यार्थी व NSS स्वयंसेवकांनी ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’ आणि ‘हर घर तिरंगा’ अशा देशभक्तीपर घोषणांनी परिसर दुमदुमून टाकला.
रॅलीदरम्यान विद्यार्थ्यांनी नागरिकांमध्ये राष्ट्रप्रेम, राष्ट्रीय एकात्मता तसेच राष्ट्रध्वजाबद्दल सन्मानाची भावना निर्माण करण्याचा संदेश दिला. प्रत्येक नागरिकाने आपल्या घरावर अभिमानाने तिरंगा फडकवून राष्ट्रध्वजाचा सन्मान राखावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या माध्यमातून देशभक्तीची भावना प्रत्येक घरापर्यंत पोहोचविण्यासाठी तसेच तरुणांमध्ये राष्ट्रीय मूल्यांची जपणूक करण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी NSS समन्वयक डॉ. सचिन यनगंदलवार, महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच NSS स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे रॅलीला देशभक्तीपूर्ण वातावरण लाभले.



