तिरंगा केवळ ध्वज नाही, तर भारताच्या स्वातंत्र्याची, शौर्याची आणि बलिदानाची अमर गाथा ; त्याचा सन्मान राखणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य – आ. सुधीर मुनगंटीवार
बल्लारपूरमध्ये भव्य तिरंगा रॅली; ‘भारत माता की जय’च्या घोषणांनी आसमंत दुमदुमला

चांदा ब्लास्ट
हातात तिरंगा, हृदयात राष्ट्रभक्तीची मशाल; तिरंगा रॅलीत नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग
बल्लारपूर : तिरंगा केवळ ध्वज नाही, तर भारताच्या स्वातंत्र्याची, शौर्याची आणि बलिदानाची अमर गाथा आहे. या तिरंग्याचा सन्मान राखणे आणि त्याची आन, बान व शान सदैव उंच ठेवणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केले. बल्लारपूर येथे आयोजित भव्य तिरंगा रॅलीत आ.मुनगंटीवार हे सपत्नीक सहभागी झाले. हातात तिरंगा, हृदयात राष्ट्रभक्ती आणि ओठांवर ‘भारत माता की जय’चा जयघोष घेऊन सहभागी झालेल्या नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागाने अवघे बल्लारपूर राष्ट्रप्रेमाच्या उत्साहाने भारावून गेले.
स्वातंत्र्यदिनाच्या पूर्व संध्येला बल्लारपूर येथे देशभक्तीच्या उत्साहात भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. यावेळी सौ. सपनाताई मुनगंटीवार, जेष्ठ नेते चंदनसिंहजी चंदेल, भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा,रणजय सिंग ब्रीजभूषण पाझारे,राम लखिया,समीर केने,निलेश खरबडे,काशिनाथ सिंग,राजू दारी,मनीष पांडे, देवेंद्र वाटकर,पिंटू देऊळकर,मोहित डंगोरे,रेणुकाताई दुबे,वैशालीताई जोशी,शुभांगी शर्मा,विद्याताई खरतड,शालूताई कुमरे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक, कार्यकर्ते, महिला, युवक व पदाधिकारी उपस्थित होते.
देशगौरव,पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून देशभरात राष्ट्रभक्तीची ज्योत प्रज्वलित करणाऱ्या ‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या पार्श्वभूमीवर (१४ ऑगस्ट) रोजी बल्लारपूर येथे भव्य तिरंगा रॅली प्रचंड उत्साहात पार पडली. डब्ल्यूसीएल काटा गेट येथून सुरू झालेल्या या रॅलीत हातात तिरंगा आणि हृदयात राष्ट्रभक्तीची भावना घेऊन हजारो नागरिक सहभागी झाले. ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’ अशा घोषणांनी संपूर्ण बल्लारपूरचा आसमंत दुमदुमून गेला.
तिरंगा यात्रा हा केवळ एका दिवसाचा कार्यक्रम नाही, तर हा संकल्पाचा दिवस आहे. आज हातात तिरंगा घेऊन आपण संकल्प करीत आहोत की, केवळ आजच नाही, तर येणारे ३६४ दिवस देशाच्या प्रगतीसाठी, विकासासाठी आणि राष्ट्राच्या गौरवासाठी आपण कार्य करणार आहोत, असे प्रतिपादन आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले. देशाच्या प्रत्येक नागरिकाच्या मनात राष्ट्रभक्तीची भावना अधिक दृढ करणाऱ्या या अभियानातून प्रेरणा घेत बल्लारपूरवासीयांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत तिरंग्याप्रती आपला अभिमान आणि राष्ट्रनिष्ठा व्यक्त केली.
हातात तिरंगा आणि हृदयात राष्ट्रभक्तीची मशाल प्रज्वलित करून आपण सर्वांनी आजची तिरंगा यात्रा यशस्वी केली आहे. या यात्रेसाठी ज्यांनी योगदान दिले, परिश्रम घेतले आणि ती यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले, त्या सर्व कार्यकर्त्यांचे मी आभार मानतो, असे आ. मुनगंटीवार म्हणाले.तिरंगा ध्वजाच्या सन्मानाबाबत ठाम भूमिका व्यक्त करताना ते म्हणाले, हा तिरंगा आपल्या गावाची शान आणि देशाचा गौरव आहे, असे त्यांनी नमूद केले.
भारत माता की जय’चा जयघोष करत देशाची एकता आणि अखंडता अधिक मजबूत करण्यासाठी आपण सदैव सज्ज राहू. राष्ट्र प्रथम, देश प्रथम ही भावना मनात ठेवून प्रत्येकाने आपल्या परीने देशाच्या प्रगतीत योगदान दिले पाहिजे, असे आवाहन आ.सुधीर मुनगंटीवार यांनी केले.पवित्र तिरंगा ध्वजाबद्दल बोलताना आ. मुनगंटीवार म्हणाले, या तिरंग्यासाठी हजारो-लाखो स्वातंत्र्यसैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यांच्या त्याग आणि बलिदानामुळेच आपण आज स्वातंत्र्याचा श्वास घेत आहोत. त्यामुळे तिरंग्याचा सन्मान म्हणजे भारताच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या प्रत्येक शूरवीराच्या त्यागाचा सन्मान आहे.
तिरंग्याची आन, बान आणि शान जपण्यासाठी आपण ही भव्य तिरंगा यात्रा काढली असून, तिला उत्स्फूर्त प्रतिसाद देणाऱ्या प्रत्येक नागरिकाचे, कार्यकर्त्याचे आणि सहभागी बंधू-भगिनींचे मी मनःपूर्वक आभार मानतो,” असे आ. मुनगंटीवार यांनी सांगितले. डब्ल्यूसीएल काटा गेट येथून सुरू झालेल्या या रॅलीत युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. देशभक्तीपर घोषणांनी दुमदुमलेल्या या रॅलीचा समारोप शगुन लॉन, सुभाष टॉकीजजवळ झाला. बल्लारपूरवासीयांच्या उत्स्फूर्त सहभागातून तिरंग्याचा सन्मान, राष्ट्राची एकता-अखंडता आणि देशाच्या प्रगतीसाठी कार्य करण्याचा संकल्प दृढ झाला.



