गुराख्यावर वाघाचा हल्ला ; गुराखी गंभीर जखमी
घनोटी तुकूम परिसरातील घटना
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. विजय वासेकर
पोंभूर्णा : तालुक्यातील घनोटी तुकूम परिसरात गुरे चारण्यासाठी गेलेल्या गुराख्यावर दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने हल्ला केल्याची घटना शुक्रवार, दि. २ ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजताच्या सुमारास घडली. साईनाथ विठोबा मंडवगडे,वय ५०, रा.घनोटी नं.१ असे गंभीर जखमी गुराख्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार साईनाथ मांडवगडे हे घनोटी तुकूम परिसरातील वनविभागाच्या कक्ष क्र.८७ मध्ये गुरे चारण्यासाठी गेले होते.यावेळी जंगल परिसरात दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर अचानक हल्ला केला.या हल्ल्यात ते जखमी झाले.वाघाचा हल्ला परतवून लावण्यासाठी त्यांनी हातात असलेल्या कुराडीच्या दांड्याने वाघावर हल्ला चढवल्याने वाघाने तेथून पळ काढल्याची प्राथमिक माहिती आहे.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी मंडवगडे यांना तातडीने पोंभूर्णा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.मात्र त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूरला हलविण्यात आले.
या घटनेमुळे घनोटी तुकूम तसेच परिसरातील गुराखी व शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने या परिसरात गस्त वाढवून वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.



