ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

धानावरील करपा, खोडकिडीच्या संकटावर आ. सुधीर मुनगंटीवार यांचा पुढाकार; मुख्यमंत्र्यांचे तातडीने कार्यवाहीचे आदेश

नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत व मोफत औषधे देण्याची आ.मुनगंटीवार यांची मागणी

चांदा ब्लास्ट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत आ.मुनगंटीवार यांनी मांडली धान उत्पादकांची व्यथा; कृषी विभागाच्या प्रधान सचिवांना कार्यवाहीचे निर्देश

मुंबई : चंद्रपूर जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांच्या उभ्या पिकावर खोडकिडी आणि करपा रोगाचे संकट गडद होत असताना आ. सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा शासकीय निवासस्थानी भेट घेऊन शेतकऱ्यांच्या गंभीर प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधले. धान पिकाच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत, नुकसानग्रस्त पात्र शेतकऱ्यांना आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी तसेच खोडकिडी व करपा रोगाच्या नियंत्रणासाठी कृषी विभागामार्फत आवश्यक औषधे मोफत उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली. या मागणीची तात्काळ दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषी विभागाच्या प्रधान सचिवांना आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.

चंद्रपूर जिल्ह्यात खरीप हंगामातील धान पिकावर सध्या अनेक भागांत खोडकिडी तसेच करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. ऐन हंगामात उभ्या पिकावर आलेल्या या संकटामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता असून, मोठ्या खर्चातून आणि मेहनतीने उभे केलेले पीक हातचे जाण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे रोग-किडीचा प्रादुर्भाव वाढण्यापूर्वीच प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.

या पार्श्वभूमीवर आ. मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना प्रत्यक्ष भेट घेऊन दिलेल्या निवेदनातून खोडकिडी व करपा रोगामुळे बाधित झालेल्या धान पिकाची गावनिहाय प्रत्यक्ष पाहणी करून तातडीने पंचनामे करण्याची मागणी केली. पंचनाम्याच्या आधारे नुकसानग्रस्त क्षेत्र निश्चित करून शासनाच्या प्रचलित निकषांनुसार पात्र शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना केली आहे.

यासोबतच,शेतकऱ्यांचे पुढील नुकसान टाळण्यासाठी केवळ पंचनामे करून न थांबता खोडकिडीच्या नियंत्रणासाठी आवश्यक कीटकनाशके आणि करपा रोगाच्या नियंत्रणासाठी आवश्यक बुरशीनाशके कृषी विभागामार्फत मोफत उपलब्ध करून देण्यात यावीत, अशी मागणीही आ.मुनगंटीवार यांनी केली. तसेच कृषी विभागाच्या पथकांनी गावागावांत आणि प्रत्यक्ष शेतांवर जाऊन पाहणी करावी, शेतकऱ्यांना औषधांचा योग्य वापर, फवारणीचे प्रमाण आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत तांत्रिक मार्गदर्शन करावे, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

धानाचे उत्पादन घटल्यानंतर मदत करण्यापेक्षा संकटाच्या सुरुवातीलाच शासनाने हस्तक्षेप करून शेतकऱ्यांचे पीक वाचवणे अधिक महत्त्वाचे आहे, अशी भूमिका आ. मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडली. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास वाचविण्यासाठी प्रशासनाने युद्धपातळीवर उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रश्नाची तातडीने दखल घेत कृषी विभागाच्या प्रधान सचिवांना आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नाला शासनस्तरावर तातडीची गती मिळाली आहे. त्यामुळे बाधित शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये