जिवतीत सागवाण तस्करीचा पर्दाफाश; पिकअपसह ६.२१ लाखांचा मुद्देमाल जप्त
चार आरोपी वनविभागाच्या ताब्यात; फरार आरोपींचा शोध सुरू

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
जिवती:- जिवती वनपरिक्षेत्रातील सोरेकसा ते शेनगाव मार्गावर सुरू असलेल्या सागवाण लाकडाच्या अवैध तस्करीचा वनविभागाने पर्दाफाश केला. गोपनीय माहितीच्या आधारे रचलेल्या सापळ्यात वनपथकाने कारवाई करून सागवाण लाकूड व पिकअप वाहन असा एकूण ६ लाख २१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, चार आरोपींना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणातील काही आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.
मा. उपवनसंरक्षक योगेश वाघाये (मध्यचांदा, चंद्रपूर) तसेच उपविभागीय वनाधिकारी मंगेश गिरडकर (राजुरा) यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिवतीच्या वनपरिक्षेत्र अधिकारी ए. डी. खोब्रागडे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.
जिवती वनपरिक्षेत्रातील सोरेकसा ते शेनगाव मार्गावर सागवाण लाकडाची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती वनविभागाला मिळाली होती. त्यानंतर वनविभागाने विशेष पथक तयार करून संशयित वाहनावर पाळत ठेवली. शेनगाव परिसरात रात्रीच्या गस्तीवेळी संशयित पिकअप वाहन अडवून तपासणी केली असता त्यामध्ये सागवाण तस्करीशी संबंधित खुणा व वाहतुकीचे अवशेष आढळून आले. परिसराची तपासणी केली असता सागवाण लाकडाचे लठ्ठे साठवून ठेवल्याचेही निदर्शनास आले.
या कारवाईत सुमारे १ लाख २१ हजार रुपये किमतीचे सागवाण लाकूड आणि सुमारे ५ लाख रुपये किमतीचे पिकअप वाहन जप्त करण्यात आले. वनविभागाने तातडीने कारवाई करत चार जणांना ताब्यात घेतले असून, या तस्करीत आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास सुरू आहे.
फरार आरोपींचा शोध घेण्याबरोबरच सागवाण तस्करीमागे कार्यरत असलेल्या संभाव्य मोठ्या रॅकेटचा छडा लावण्यासाठी वनविभागाकडून सखोल चौकशी सुरू आहे. त्यामुळे या तपासातून आणखी आरोपी आणि तस्करीचे धागेदोरे समोर येण्याची शक्यता आहे.
या कारवाईत क्षेत्रसहायक एस. एम. सलामे (शेनगाव), एस. व्ही. सावसागडे, एन. आर. चापले (पाटण), ए. एम. गेडाम (जिवती) तसेच ए. डी. गोरकर, अविनाश राठोड, सय्यद, एम. ई. मोरे, पी. एच. कोवे, आर. सी. टेकाम यांच्यासह वनविभागाच्या अन्य कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
अवैध वृक्षतोड, सागवाण तस्करी आणि वनसंपत्तीच्या अवैध वाहतुकीविरोधात वनविभागाची कारवाई यापुढेही सुरूच राहणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. या कारवाईमुळे जिवती वनपरिक्षेत्रात वनसंपत्तीच्या संरक्षणासाठी वनविभागाने कडक पावले उचलल्याचे अधोरेखित झाले आहे.



