ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कोट्यवधींच्या खर्चातून उभारलेल्या बसस्थानकाची छत कोसळली; निकृष्ट दर्जाच्या कामाचा बुरखा फाटला

वर्धा लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमर काळे यांनी केली प्रत्यक्ष पाहणी; दोषींवर कारवाईची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा :_ प्रवाशांच्या सोयीसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करून उभारण्यात आलेल्या सेलू येथील अत्याधुनिक बसस्थानकाच्या बांधकाम गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अवघ्या दीड ते दोन वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या बसस्थानकाच्या छताचा मोठा भाग गुरुवारी रात्री अचानक कोसळल्याने बांधकामातील निकृष्ट दर्जाचे काम पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहे.

घटनेच्या वेळी बसस्थानक परिसरात नागरिक किंवा प्रवासी उपस्थित नसल्याने मोठी जीवितहानी टळली. मात्र, छत कोसळल्याच्या घटनेने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून संबंधित कंत्राटदार, अभियंते व जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.

घटनेची माहिती मिळताच वर्धा लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमर काळे यांनी बसस्थानकाला भेट देत कोसळलेल्या भागाची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेत बांधकामाच्या गुणवत्तेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. सार्वजनिक निधीतून उभारलेल्या प्रकल्पांमध्ये दर्जेदार काम होणे आवश्यक असून नागरिकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या निष्काळजीपणाला माफी नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, बसस्थानकाचे उद्घाटन झाल्यानंतर काही महिन्यांतच त्यातील त्रुटी समोर येऊ लागल्या होत्या. जोरदार वाऱ्यामुळे बसस्थानकावरील नामफलक उडून गेला होता. पावसाळा सुरू होताच छतामधून मोठ्या प्रमाणात पाणी गळती सुरू झाली होती. अनेकदा प्रवाशांना बसस्थानकाच्या आत उभे राहूनही छत्रीचा वापर करावा लागत होता. याबाबत वारंवार तक्रारी करूनही संबंधित विभागाने गांभीर्याने दखल घेतली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

आता प्रत्यक्ष छताचा भाग कोसळल्याने बांधकामातील अनियमितता, निकृष्ट साहित्याचा वापर आणि देखरेखीतील हलगर्जीपणा उघड झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेली वास्तू एवढ्या कमी कालावधीत धोकादायक बनत असेल तर कामाच्या दर्जाबाबत गंभीर शंका उपस्थित होणे स्वाभाविक असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत.

या घटनेनंतर बसस्थानकात येणाऱ्या हजारो प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. संपूर्ण बांधकामाची तातडीने तांत्रिक तपासणी करून दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, तसेच भविष्यात अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शहरवासीयांकडून होत आहे.

सार्वजनिक निधीतून उभारलेल्या विकासकामांच्या गुणवत्तेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, या प्रकरणातील चौकशी अहवालाकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

या वेळी शेखर शेंडे, अभ्युदय मेघे, काशिनाथ लोणकर, अमर गुंधी, चुडामन हांडे, रामू पवार, शुभम झाडे, योगेश गुजरकर व तसेच विविध पदाधिकारी उपस्थित होते

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये