ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गणेशोत्सवात पाच दिवसांपासून पाणीपुरवठा ठप्प ; पोंभुर्णेकरांची पाण्यासाठी वणवण

कमी व्होल्टेज, नेटवर्कच्या कोंडीत पाणीपुरवठा यंत्रणा; पर्यायी व्यवस्थेअभावी नगरपंचायतीच्या नियोजनावर ताशेरे

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. विजय वासेकर

पोंभुर्णा : गणेशोत्सवाचा सण उत्साहात सुरू असताना पोंभुर्णा शहरातील पाणीपुरवठा गेल्या पाच दिवसांपासून ठप्प असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. वैनगंगा नदीवरून शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या घाटकुड येथील केंद्रात कमी व्होल्टेजमुळे वीज वारंवार ट्रिप होत असल्याने पंप चालविण्यात अडथळे येत आहेत. परिणामी शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.

शहरात आधीच एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो. त्यात गणेशोत्सवाच्या काळात सलग पाच दिवस नळाला पाणी न आल्याने नागरिकांच्या अडचणी गंभीर झाल्या आहेत. पिण्याच्या पाण्यासह घरगुती वापरासाठी पाण्याची जुळवाजुळव करावी लागत आहे. सणाच्या दिवसांतही पाण्यासाठी धावपळ करावी लागत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.

वैनगंगा नदीवरील पंप हाताने सुरू करण्याची सुविधा असून, मोबाईलद्वारे मोटार सुरू करण्याची व्यवस्थाही आहे. मात्र, पंप केंद्र परिसरातील नेटवर्कच्या समस्येमुळे मोबाईलद्वारे मोटार सुरू करण्यात अडथळे येत आहेत. त्यातच कमी व्होल्टेजमुळे वीज वारंवार ट्रिप होत असल्याने पाणी उपसण्याची प्रक्रिया सुरळीत होत नसल्याचे सांगण्यात येत आहे

वीजपुरवठ्यातील अडचण आणि नेटवर्कची समस्या अचानक निर्माण झालेली नसताना, पाच दिवसांच्या पाणीपुरवठा खंडित स्थितीत पर्यायी व्यवस्था उभी करण्यात नगरपंचायतीला यश का आले नाही? असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. गणेशोत्सवासारख्या सणाच्या काळात पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी पूर्वनियोजन अपेक्षित असताना नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने नगरपंचायतीच्या पाणीपुरवठा नियोजनावर ताशेरे ओढले जात आहेत.

तांत्रिक अडचणींचा परिणाम नागरिकांवर होऊ नये यासाठी पर्यायी पंप, टँकर किंवा अन्य व्यवस्था उपलब्ध करून देण्याची गरज होती, अशी नागरिकांची भूमिका आहे. प्रशासनाने तातडीने पाणीपुरवठा सुरळीत करावा आणि भविष्यात अशा परिस्थितीची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी वीज, नेटवर्क तसेच पाणी उपसा यंत्रणेचे प्रभावी नियोजन करावे, अशी मागणी होत आहे.

गणेशोत्सवाच्या काळात पाच दिवस शहराचा पाणीपुरवठा ठप्प राहणे हे नगरपंचायतीच्या ढिसाळ नियोजनाचे उदाहरण आहे. तांत्रिक अडचणींची कारणे सांगण्यापेक्षा पर्यायी व्यवस्था करणे गरजेचे होते. नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागणे दुर्दैवी असून प्रशासनाने तातडीने जबाबदारीने उपाययोजना करावी.”

— आशिष कावटवार, विरोधी पक्षनेता, नगरपंचायत, पोंभुर्णा

कमी व्होल्टेज व मोबाईल नेटवर्कच्या समस्येमुळे नदीवरील पंप सुरू करताना तांत्रिक अडचणी येत आहेत. महावितरण विभागाशी संपर्क साधला असून, समस्येच्या निवारणासाठी दुरुस्तीचे काम सुरू आहे. पाणीपुरवठा लवकरात लवकर सुरळीत करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत.

— उमेश शेंडे, पाणीपुरवठा अभियंता, नगरपंचायत पोंभुर्णा

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये