ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सिंदखेडराजा मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या अश्रूंना न्याय मिळणार?

माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांची हेक्टरी ₹५० हजार मदतीची नामदार एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

दिवाळीपूर्वी मदत देण्याचे सकारात्मक आश्वासन 

सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातील देऊळगाव राजा, सिंदखेडराजा, चिखली आणि लोणार तालुक्यात यंदा पावसाने दीर्घकाळ दडी मारल्याने खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने केलेली पेरणी वाया गेली असून उगवलेली पिकेही करपल्याने बळीराजावर अभूतपूर्व आर्थिक संकट कोसळले आहे. या संकटातून शेतकऱ्यांना दिलासा मिळावा म्हणून आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते नामदार एकनाथ शिंदे यांच्याकडे हेक्टरी ₹५० हजार आर्थिक मदत, पीक विम्याची तातडीने नुकसानभरपाई आणि दुष्काळी सवलती लागू करण्याची जोरदार मागणी केली.

राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुलढाणा जिल्ह्यातील विविध गावांना भेट देऊन शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष नुकसानीची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. याचवेळी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या वतीने सविस्तर निवेदन सादर केले.

निवेदनात सिंदखेडराजा मतदारसंघ कोरडा दुष्काळग्रस्त घोषित करावा, हेक्टरी ₹५० हजार आर्थिक मदत द्यावी, पीक विम्याची नुकसानभरपाई तात्काळ वितरित करावी तसेच शासनाच्या सर्व दुष्काळी सवलती बाधित शेतकऱ्यांना लागू कराव्यात, अशी मागणी करण्यात आली.

यावेळी डॉ. शशिकांत खेडेकर म्हणाले, “यंदा सुरुवातीला पेरलेले पीक उगवले नाही आणि जे उगवले तेही पावसाअभावी करपून गेले. अनेक शेतकऱ्यांचे शंभर टक्के नुकसान झाले आहे. बळीराजावर मोठे आर्थिक संकट आले असून अशा परिस्थितीत शासनाने केवळ पंचनाम्यांवर न थांबता शंभर टक्के नुकसानभरपाई देणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात तातडीने मदत जमा झाली तरच त्यांना पुढील हंगामासाठी उभारी मिळेल.”

डॉ. खेडेकर यांनी शासनाने दिवाळीपूर्वी मदतीची घोषणा करून ती प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी, अशी आग्रही मागणीही केली.

यावर उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा संवेदनशीलतेने ऐकून घेत, “सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघ मदतीविना राहणार नाही. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. झालेल्या नुकसानीचा अहवाल तातडीने मागवून जास्तीत जास्त मदत देण्यासाठी सकारात्मक निर्णय घेतला जाईल. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत मिळावी, यासाठी शासन प्रयत्नशील आहे,” असे आश्वासन दिले.

या आश्वासनामुळे दुष्काळाने होरपळलेल्या सिंदखेडराजा मतदारसंघातील शेतकऱ्यांमध्ये आशेचा किरण निर्माण झाला आहे. शासनाकडून हेक्टरी ₹५० हजार मदत, पीक विम्याची नुकसानभरपाई आणि इतर दुष्काळी सवलती लवकरात लवकर जाहीर होऊन शेतकऱ्यांना प्रत्यक्ष दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख बाबुराव मोरे, युवासेना जिल्हा सरचिटणीस श्रीनिवास खेडेकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राहुल काबरा तसेच शिवसेना व युवासेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये