७८ वेळा रक्तदान करून जितेंद्र मशारकर यांचा सेवाभावी आदर्श; अनेक रुग्णांना जीवनदान!
वाढदिवसाचे औचित्य साधत ७८ वे रक्तदान; शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रशस्तीपत्र देऊन गौरव

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर : रक्तदान हे केवळ सामाजिक कर्तव्य नसून एखाद्याला जीवनदान देण्याचे सर्वश्रेष्ठ कार्य आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या रक्तपेढीत अनेकदा रक्ताचा तुटवडा जाणवतो. या रुग्णालयात प्रामुख्याने ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर, हमाल तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील रुग्ण उपचारासाठी येतात. अशा गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे आणि कोणाचाही जीव रक्ताअभावी धोक्यात येऊ नये, यासाठी नियमित रक्तदानाची नितांत आवश्यकता आहे.
याच सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून चंद्रपूर येथील सामाजिक कार्यकर्ते व नियमित रक्तदाता जितेंद्र रामचंद्र मशारकर यांनी तब्बल ७८ वेळा रक्तदान करून समाजासमोर एक प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे. दर तीन महिन्यांनी नियमितपणे रक्तदान करण्याचा संकल्प त्यांनी सातत्याने जपला आहे. विशेष म्हणजे, १ नोव्हेंबर रोजी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांनी आयुष्यातील ७८ वे रक्तदान केले. स्वतःचा वाढदिवस केवळ आनंदोत्सव म्हणून न साजरा करता दुसऱ्याच्या जीवनात आनंद फुलविण्याचा त्यांचा हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे.
‘नाते रक्ताचे फाउंडेशन’चा सेवाभावी उपक्रम
युवकांनी एकत्र येऊन स्थापन केलेले ‘नाते रक्ताचे फाउंडेशन’ ही गरजू रुग्णांसाठी कार्य करणारी सेवाभावी संस्था आहे. या फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक युवक सामाजिक कार्यात सहभागी झाले असून, गरजू रुग्णांना मोफत रक्त उपलब्ध करून देण्यासाठी संस्थेचे कार्यकर्ते सातत्याने प्रयत्नशील असतात. विशेषतः दुर्मिळ रक्तगटाची आवश्यकता असताना रक्तदाते शोधणे कठीण जाते. अशा प्रसंगी संस्थेचे युवक तत्परतेने पुढे येऊन रक्तदान करतात आणि रुग्णांच्या नातेवाइकांना मोठा दिलासा देतात.
७८ व्या रक्तदानप्रसंगी गौरव
जितेंद्र मशारकर यांच्या ७८ व्या रक्तदानप्रसंगी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या वतीने त्यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी शासकीय रुग्णालयाचे डॉ. अनिल बिश्नोई, समाजसेवा अधीक्षक राकेश शेंडे, समुपदेशक सचिन खणके, ब्रदर उज्ज्वल जवंजाळ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ रुपाली येणुरकर, ‘नाते रक्ताचे फाउंडेशन’चे अध्यक्ष किसन नागरकर, आशिष मानकानी तसेच छोटूभाई पटेल हायस्कूलच्या माजी मुख्याध्यापिका माधवी कांत (आई) आदी मान्यवर उपस्थित होते.
युवकांना नियमित रक्तदानाचे आवाहन
रक्तदानाबाबत समाजात आजही काही गैरसमज आहेत. मात्र, वैद्यकीय निकषांनुसार पात्र व्यक्तीने योग्य अंतराने आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान केल्यास ते सुरक्षित असते. त्यामुळे युवकांनी रक्तदानाविषयीचे गैरसमज दूर करून स्वयंस्फूर्तीने पुढे यावे. दर तीन महिन्यांनी रक्तदान करण्याची सवय लावून घ्यावी आणि शासकीय रुग्णालयातील रक्तपेढीला सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
‘आपल्या रक्ताचा एक थेंब कोणाच्या तरी आयुष्यातील आशेचा किरण ठरू शकतो. रक्तदान हेच खरे जीवनदान!’ हा संदेश आपल्या कृतीतून देणारे जितेंद्र मशारकर यांचे ७८ वेळा रक्तदान हे केवळ वैयक्तिक यश नसून समाजसेवेचा आणि माणुसकीचा प्रेरणादायी प्रवास आहे.



