ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

यशोधन विहारच्या सदनिकांना अल्पावधीत तडे

बांधकामाच्या गुणवत्तेची तांत्रिक चौकशी करण्याची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

कोरपना : यशोधन विहार (म्हाडा) प्रकल्पातील सदनिकांच्या बांधकामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, सदनिका खरेदी केल्यानंतर अल्पावधीतच बांधकामाला तडे गेल्याची तक्रार सदनिका धारक ज्ञानेश्वर गोखरे यांनी म्हाडाच्या नागपूर विभागाकडे केली आहे. या प्रकरणाची स्वतंत्र तांत्रिक चौकशी करून दोष आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

यशोधन विहार प्रकल्पातील सदनिका क्रमांक 39/08 ही ज्ञानेश्वर गोखरे यांनी 28 जुलै 2025 रोजी 10 लाख 26 हजार 790 रुपयांना खरेदी केली आहे. मात्र, सदनिका खरेदी केल्यानंतर अल्प कालावधीतच सदनिकेच्या बांधकामात तडे/क्रॅक्स आढळून आल्याचे त्यांच्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे, प्रकल्पातील इतर काही सदनिकांमध्येही अशाच प्रकारचे तडे गेल्याची माहिती रहिवाशांकडून मिळत असल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. त्यामुळे या तड्यांचे स्वरूप केवळ प्लास्टरपुरते मर्यादित आहे की ते बांधकामाच्या संरचनात्मक गुणवत्तेशी संबंधित आहेत, याची तांत्रिक तपासणी होणे आवश्यक असल्याचे गोखरे यांनी म्हटले आहे.

क्यूब टेस्टसह गुणवत्ता नियंत्रणाच्या नोंदी तपासण्याची मागणी

तक्रारीमध्ये प्रकल्पातील आर.सी.सी. कामाची स्वतंत्र तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. बांधकामादरम्यान काँक्रीटचे Cube Samples, त्यांची ओळख, दिनांक, ठिकाण तसेच संबंधित गुणवत्ता नियंत्रणाच्या नोंदी ठेवण्यात आल्या होत्या का, याची पडताळणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

यासोबतच Cube Test Reports, Concrete Mix Design, Slump Test Reports, Material Test Reports, Structural Drawings तसेच म्हाडाच्या संबंधित अभियंत्यांनी केलेल्या प्रत्यक्ष पाहणीचे अहवाल तपासण्याची मागणी करण्यात आली आहे.

स्ट्रक्चरल इंजिनिअरमार्फत तपासणीची मागणी

सदनिकांना गेलेले तडे नेमके कोणत्या कारणामुळे निर्माण झाले, याचा शोध घेण्यासाठी पात्र स्ट्रक्चरल इंजिनिअरमार्फत स्वतंत्र तपासणी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. केवळ वरवरची डागडुजी न करता तड्यांचे मूळ कारण शोधून कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात यावी, असेही तक्रारीत नमूद आहे.

तसेच यापूर्वी करण्यात आलेल्या दुरुस्तीची नोंद, सदनिका धारकांच्या तक्रारी आणि प्रकल्पधारकाकडून करण्यात आलेल्या कार्यवाहीचीही चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

म्हाडाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करावी

यशोधन विहार प्रकल्पाची म्हाडाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह अभियंत्यांच्या स्वतंत्र पथकाकडून प्रत्यक्ष पाहणी करण्यात यावी, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. तडे गेलेल्या सदनिकांचा तांत्रिक पंचनामा/निरीक्षण अहवाल तयार करून आवश्यक असल्यास अधिकृत प्रयोगशाळेमार्फत काँक्रीट व इतर बांधकाम साहित्याची गुणवत्ता तपासावी, अशी मागणी आहे.

बांधकामात नियमांचे उल्लंघन किंवा निकृष्ट दर्जाचे काम आढळल्यास संबंधित प्रकल्पधारक, कंत्राटदार अथवा जबाबदार व्यक्तींवर नियमानुसार कारवाई करावी. तसेच सदनिकाधारकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने बांधकाम धोकादायक आढळल्यास तातडीने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी गोखरे यांनी केली आहे.

“मोठ्या कष्टाने पाई पाई जमा करून खरेदी केलेल्या घराला अल्पावधीतच तडे जाणे ही गंभीर बाब आहे. त्यामुळे केवळ किरकोळ डागडुजी न करता बांधकामाची गुणवत्ता आणि सदनिकाधारकांची सुरक्षितता या दोन्ही बाबींचा विचार करून सखोल तांत्रिक चौकशी करावी,” अशी मागणी सदनिका धारक ज्ञानेश्वर गोखरे यांनी केली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये