आंतरराष्ट्रीय सूक्ष्मजीव दिनानिमित्त पोस्टर व प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्स, गडचांदूर येथे आंतरराष्ट्रीय सूक्ष्मजीव दिनानिमित्त सूक्ष्मजीवशास्त्र व जैवतंत्रज्ञान विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी पोस्टर स्पर्धा व प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शैलेंद्र देव होते. यावेळी IQAC समन्वयक डॉ. रामकृष्ण पाटले, सूक्ष्मजीवशास्त्र विभागप्रमुख श्री. चेतन वानखेडे तसेच जैवतंत्रज्ञान विभागाचे समन्वयक डॉ. उत्कर्ष मून यांची प्रमुख उपस्थिती होती.
आंतरराष्ट्रीय सूक्ष्मजीव दिनाचे महत्त्व, मानवी जीवनातील सूक्ष्मजीवांचे योगदान, पर्यावरण, अन्न, आरोग्य, उद्योग व जैवतंत्रज्ञानातील सूक्ष्मजीवांची भूमिका याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विविध वैज्ञानिक विषयांवर आकर्षक व माहितीपूर्ण पोस्टर्स सादर केले. तसेच प्रश्नमंजुषा स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला.
पोस्टर स्पर्धेत मिस सानिया शेख हिने प्रथम क्रमांक, तर तमन्ना नाकोलू हिने द्वितीय क्रमांक प्राप्त केला. विजेत्या विद्यार्थिनींचे मान्यवरांच्या हस्ते अभिनंदन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सूक्ष्मजीवशास्त्र व जैवतंत्रज्ञान विभागातील शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले. महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कार्यक्रमास उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी डॉ. उत्कर्ष मून यांनी आभार प्रदर्शन करून प्राचार्य, IQAC समन्वयक, विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि सहभागी विद्यार्थ्यांचे आभार मानले.



