ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मायभूमी करंजीचे ऋण फेडण्याची नामी संधी

करंजीकरांच्या स्वागताने किशोर वडेट्टीवार भारावले

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

गोंडपिपरी :_ ३१ ऑगस्ट रोजी सर्वत्र मतदार याद्या प्रकाशित झाल्या. गोंडपिपरीतही प्रारूप याद्या धडकल्या. यावेळी सध्यस्थितीत गडचिरोलीत वास्तव्यात असलेले विजय वडेट्टीवारांचे धाकटे बंधू किशोर वडेट्टीवार यांचे नाव गोंडपिपरी तालुक्याच्या यादीत पाहायला मिळाले आणि आगामी जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या नावाच्या समावेशाला वेगळे महत्त्व प्राप्त झाले. किशोर वडेट्टीवारांचे नाव करंजी तर त्यांच्या पत्नी गीता किशोर वडेट्टीवार यांचे नाव पानोरा गावच्या यादीत समाविष्ट झाल्याने चर्चेला उधाण आले.

नाव समाविष्ट झाल्याच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी (दि.२४) पहिल्यांदा किशोर वडेट्टीवारांनी करंजी गावाला भेट दिली. यावेळी गावकऱ्यांकडून त्यांचे जल्लोषात स्वागत झाले. वडेट्टीवार यापूर्वी अनेकदा करंजीत आले. मात्र गुरुवारी गावकऱ्यांच्या प्रेम, आपुलकी आणि मायेच्या स्पर्शाने वडेट्टीवार भारावले. जन्मभूमीचे ऋण फेडण्यासाठी आलोय, अशी ग्वाही गावकऱ्यांशी संवाद साधताना किशोर वडेट्टीवार यांनी दिली.

राज्याचे विधिमंडळ गटनेते, ब्रह्मपुरीचे आमदार विजय वडेट्टीवारांचे वडील नामदेवराव वडेट्टीवार १९७२ ते ७७ या काळात सरपंच राहिले तर वडिलांनंतर त्यांचे जेष्ठ बंधू विलास वडेट्टीवार उपसरपंच होते. गावच्या विकासात वडेट्टीवार कुटुंबाचे योगदान राहिले आहे. गावावरील संकटसमयी आणि अडचणीच्या काळात नेहमीच वडेट्टीवार परिवार करंजीच्या पाठीशी उभा राहिला आहे. ऋणानुबंधांचा हा वारसा निरंतर सुरू राहणार असून “मायभूमी”चे कर्ज फेडण्यासाठी मी पुन्हा आलो, असे मत यावेळी गावकऱ्यांची संवाद साधताना किशोर वडेट्टीवारांनी बोलून दाखवले.

गावकऱ्यांच्या या भेटीदरम्यान वडेट्टीवारांनी गावातील सर्व गणेश मंडळांना भेटी दिल्या. गावकऱ्यांना “सुखी ठेव” अशी साद गणपती बाप्पाला घातली. युवकांशी संवाद साधला. ज्येष्ठ नागरिक आणि वृद्धांचे आशीर्वाद घेतले. करंजी गट ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या जोगापूर गावला भेट दिली.जोगापुरातील पांडुरंग आत्राम यांचे अपघातात निधन झाले तर सचिन सोयाम या युवकाचा अपघात झाल्याने गंभीर दुखापत झाली. दोनही कुटुंबांना भेट देत वडेट्टीवारांनी आर्थिक मदत देऊ केली.

यावेळी त्यांच्यासोबत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कमलेश निमगडे, महेंद्र कुनघाडकर, माजी उपसरपंच सारनाथ बक्षी, सिंधू गावडे, ग्रा.पं.सदस्य रामदास मोहुर्ले, निखिल बामणे, तंटामुक्ती अध्यक्ष रघुनाथ मोहुर्ले, माजी तंमुस अध्यक्ष दिलीप वासेकर, मधुकर तेल्कापल्लीवार, दिलीप चापले, मारोती जुवारे, विमल कतलाम, सुशिला येलचलवार, सुमनबाई जंगठे यांच्यासह गावातील युवक, महिलांसह ज्येष्ठ नागरिकांची उपस्थिती होती.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये