राज्यसिमेवरील पारधीगुड्यात आदिवासी विभागाकडून “सेवा संकल्प अभियान”
विविध प्रकारच्या शासकीय दाखल्यांचे वाटप आणि नागरिकांची आरोग्य तपासणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
आदिवासी विकास विभागाच्या उपक्रमाला ग्रामस्थांचा प्रतिसाद
आदिवासी विकास विभागाच्या ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत महाराष्ट्र_तेलंगणा राज्यसिमेवरील राजुरा तालुक्यातील पारधीगुडा (लक्कडकोट) येथे गुरुवारी (दि. २४ सप्टेंबर) विशेष आरोग्य तपासणी व जनसेवा उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. सुधाकरराव नाईक आश्रमशाळा, पारधीगुडा (लक्कडकोट) येथे सकाळी १० वाजता झालेल्या या उपक्रमात ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवित विविध शासकीय सेवा व आरोग्य सेवांचा लाभ घेतला.
महसूल विभागाच्या वतीने शिधापत्रिका अर्ज, शिधापत्रिका, विवाह नोंदणी, संजय गांधी निराधार योजना, उत्पन्नाचा दाखला अशा विविध शासकीय दाखल्यांचे वाटप करण्यात आले तर आरोग्य विभागाकडून आरोग्य तपासणीमध्ये नागरिकांच्या रक्तदाबाची (BP) तपासणी, रक्तातील साखरेची (Sugar) तपासणी, हिमोग्लोबिन (H.B.) तपासणी तसेच सामान्य आरोग्य तपासणी करण्यात आली.
नायब तहसीलदार प्रवीण गावंडे, आदिवासी विकास निरीक्षक अमोल नवलकर यांच्या उपस्थितीत नागरिकांना विविध शासकीय सेवांचा लाभ व आरोग्य तपासणी करण्यात आली. गावपातळीवर शासनाच्या सेवा थेट नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या ‘सेवा संकल्प’ अभियानाचा हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला. एकाच ठिकाणी विविध शासकीय सेवा व आरोग्य तपासण्या उपलब्ध झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
आदिवासी विकास विभागाकडून आयोजित “सेवा संकल्प” जनकल्याणकारी उपक्रम यशस्वी करण्याकरिता सरपंच सजणाबाई आत्राम, मंडळ अधिकारी विशाल कोसनकर, ग्राम पंचायत अधिकारी निशा कालीवाले, आरोग्य विभागाचे अमोल कोरांगे, आशा सेविका सीमा कोरवते, मंगला रामटेके, अन्न पुरवठा विभागाचे करिश्मा येंगलवार, सोनाली कथडे यांनी अथक परिश्रम घेतले. ग्राम पंचायत स्तरावरील सर्व कर्मचारी व नागरिकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घेतला.



