ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मनुष्यबळाअभावी पाथरी प्राथमिक आरोग्य केंद्राचा अजब कारभार

ओपीडीतील शिस्तीसाठी डॉक्टरांच्या मातोश्रींची डॉक्टरांच्या केबिनमध्ये उपस्थिती

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार

रुग्णांच्या गोपनीयतेचा प्रश्न ऐरणीवर

 सावली तालुक्यातील पाथरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्यसेवेचा कारभार सध्या चांगलाच चर्चेत आला असून, मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे रुग्णांना सुविधा देण्याऐवजी अजब पर्यायी व्यवस्था राबविली जात असल्याची बाब समोर आली आहे. ओपीडीमध्ये रुग्णांची गर्दी वाढू नये आणि शिस्त राखली जावी, या कारणासाठी डॉक्टरांच्या मातोश्रींना डॉक्टरांच्या केबिनमध्ये बसविले जात असल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकारामुळे रुग्णांच्या गोपनीयतेसह आरोग्य केंद्राच्या प्रशासकीय कारभारावरही गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्र हे सर्वसामान्य नागरिकांसाठी विश्वासाचे ठिकाण असते. येथे येणाऱ्या रुग्णांमध्ये महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक तसेच विविध संवेदनशील आरोग्य समस्या असलेले रुग्ण असतात. अशा वेळी डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील संवाद पूर्णपणे गोपनीय असणे अपेक्षित असते. मात्र, डॉक्टरांच्या केबिनमध्ये वैद्यकीय कर्मचारी नसलेल्या व्यक्तीची उपस्थिती असल्यास रुग्णांना आपली वैयक्तिक माहिती सांगताना संकोच वाटण्याची शक्यता आहे.

ओपीडीची गर्दी आणि रुग्णांची शिस्त राखण्याची जबाबदारी ही आरोग्य केंद्रातील नियुक्त कर्मचाऱ्यांची असते. त्यासाठी डॉक्टरांच्या कुटुंबातील व्यक्तीला केबिनमध्ये बसविणे ही नियमित प्रशासकीय पद्धत आहे का

मनुष्यबळ कमी असेल तर त्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे मागणी करणे, रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया राबविणे आणि उपलब्ध कर्मचाऱ्यांचे योग्य नियोजन करणे अपेक्षित आहे. मात्र, या सर्व प्रक्रियांऐवजी घरातील व्यक्तीच्या मदतीने शासकीय आरोग्य केंद्राचा कारभार चालविण्याची वेळ आली असेल, तर ही बाब निश्चितच गंभीरपणे तपासण्याची गरज आहे.

रुग्णांच्या मनात ‘गोपनीयते’ची भीती

विशेषतः महिला रुग्णांना काही आरोग्यविषयक तक्रारी डॉक्टरांशी सांगताना आधीच संकोच वाटत असतो. त्यात डॉक्टरांच्या कुटुंबातील व्यक्ती केबिनमध्ये उपस्थित असेल, तर रुग्णांनी आपली समस्या मोकळेपणाने मांडायची कशी, असा प्रश्न निर्माण होतो.

खासगी स्वरूपाच्या आरोग्य तक्रारी, संवेदनशील बाबी सांगताना रुग्णांना पूर्ण गोपनीयतेची आवश्यकता असते. डॉक्टरांच्या केबिनमध्ये अनधिकृत किंवा अनावश्यक व्यक्ती उपस्थित असल्याची भावना निर्माण झाली, तर रुग्ण उपचारापासूनच दूर राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.

*‘शिस्त’ राखण्याच्या नावाखाली रुग्णांची कोंडी?*

ओपीडीमध्ये शिस्त राखणे गरजेचे आहे, यात दुमत नाही. मात्र, शिस्त राखण्यासाठी डॉक्टरांनी आपल्या आईलाच का बसविले असा प्रश्न आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. आरोग्य केंद्रातील कर्मचारी कमी असतील तर शासनाकडून मनुष्यबळ उपलब्ध करून घेणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे.

डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याला अशा प्रकारे शासकीय आरोग्य केंद्राच्या कामकाजात सहभागी करून घेने हे कोणत्या नियमानुसार योग्य आहे.

या संपूर्ण प्रकारात केवळ मनुष्यबळाची कमतरता हे कारण पुढे करून जबाबदारी झटकता येणार नाही. डॉक्टरांनीही रुग्णांच्या गोपनीयतेला सर्वोच्च प्राधान्य देणे अपेक्षित आहे. रुग्ण तपासणीच्या वेळी कोण उपस्थित असावे आणि कोण नसावे, याबाबत डॉक्टरांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे

 आरोग्य केंद्रात कर्मचारी उपलब्ध नसतील तर त्याची शिक्षा रुग्णांनी का भोगावी? रुग्णांना आपल्या आजाराची माहिती मोकळेपणाने सांगण्यासाठी सुरक्षित आणि गोपनीय वातावरण मिळने गरजेचे आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये