ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वणी केंद्राच्या पहिल्या शिक्षण परिषदेत गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा मंत्र

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे

जिवती :- जिवती पंचायत समिती अंतर्गत वणी केंद्राची पहिली शिक्षण परिषद सोमवारी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, पुडियाल मोहदा येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. परिषदेत गुणवत्तापूर्ण शिक्षण, शैक्षणिक नवोपक्रम आणि शिक्षकांची भूमिका यावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले.

शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अरविंद बालाजी अलट यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास गटशिक्षणाधिकारी संदीप चौधरी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तर नवनियुक्त केंद्र समन्वयक बालाजी मुंडे आणि गटसमूह साधन व्यक्ती अंकुश राठोड यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. विद्यार्थिनींनी सादर केलेल्या स्वागतगीताने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी नवनियुक्त केंद्रप्रमुख बालाजी मुंडे यांचा वणी केंद्र शिक्षक समूहाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

राज्यस्तरीय मंथन परीक्षेत केंद्रात प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा बालाजी मुंडे व अंकुश राठोड यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. तसेच समायोजनाने नव्याने रुजू झालेल्या शिक्षकांचे स्वागत करण्यात आले. नवविवाहित शिक्षक इंगळे व घुनके यांचाही केंद्राच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.

प्रास्ताविकात बालाजी मुंडे यांनी शिक्षण परिषदेची उद्दिष्टे स्पष्ट केली. प्रमुख अतिथी संदीप चौधरी यांनी शिक्षकांना विद्यार्थीकेंद्रित अध्यापन, गुणवत्तापूर्ण शिक्षण, शैक्षणिक नवोपक्रम आणि बदलत्या शैक्षणिक प्रवाहाशी सुसंगत अध्यापन पद्धती अवलंबण्याचे आवाहन केले.

परिषदेत भूषण राऊत, राजेंद्र बनकर, महेश लबडे, विकी मेश्राम आणि प्रणय पद्मगिरीवार यांनी विविध विषयांवर तासिका घेऊन शिक्षकांना मार्गदर्शन केले. दुपारच्या सत्रात केंद्रप्रमुख बालाजी मुंडे यांनी प्रशासकीय तासिका घेऊन विविध शैक्षणिक व प्रशासकीय विषयांवर सविस्तर सूचना दिल्या.

कार्यक्रमाचे आभार राहुल पालवे यांनी मानले. वणी केंद्रातील सर्व शिक्षकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभलेल्या या शिक्षण परिषदेत शैक्षणिक गुणवत्ता वृद्धीसाठी महत्त्वपूर्ण विचारांची देवाणघेवाण झाली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये