ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी करुणकोंडी शाळेच्या नव्या इमारतीची मागणी

गटशिक्षणाधिकाऱ्यांना शालेय व्यवस्थापन समितीचे निवेदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे

जिवती :- तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, करुणकोंडी येथील शाळेची इमारत अत्यंत जीर्ण व धोकादायक बनली असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे विद्यमान इमारतीचे तातडीने निर्लेखन करून नवीन सुसज्ज शाळा इमारत उभारावी, अशी मागणी शालेय व्यवस्थापन समितीने गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

सुमारे ४० वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या शाळेच्या इमारतीला अनेक ठिकाणी मोठे तडे गेले आहेत. छताची झीज, कमकुवत झालेल्या भिंती आणि ढासळलेली रचना यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी सध्या शाळेचे वर्ग संत सेवालाल महाराज मंदिर परिसरात भरवले जात आहेत. मात्र पावसाळ्यात ही व्यवस्था अपुरी ठरत असल्याने विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

या शाळेत इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत शिक्षण दिले जाते. शाळेत केवळ दोन वर्गखोल्या असून दोन शिक्षक कार्यरत आहेत. सुमारे ४० विद्यार्थी शिक्षण घेत असल्याने उपलब्ध जागा अपुरी पडत आहे. विद्यार्थ्यांना सुरक्षित, प्रशस्त आणि आधुनिक सुविधांनी युक्त शैक्षणिक वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी नवीन शाळा इमारतीची आवश्यकता असल्याचे शालेय व्यवस्थापन समितीने निवेदनात नमूद केले आहे.

शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्रीदास राठोड, ग्रामपंचायत सदस्य आनंद कदम, सुरेश राठोड तसेच पालकांनी जिवती पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी यांना लेखी निवेदन सादर केले. विद्यमान जीर्ण इमारतीचे निर्लेखन करून शाळेसाठी नवीन दोन मजली इमारतीच्या बांधकामास तातडीने मंजुरी द्यावी व आवश्यक निधी उपलब्ध करून कामाला लवकर सुरुवात करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये