सेवानिवृत्त कामगारांचा सत्कार : स्पंज आर्यण कामगार संघटनेने जपला सामाजिक बांधिलकीचा आदर्श
गोपाणी आर्यण पॉवर कंपनीतील ज्येष्ठ कर्मचाऱ्यांच्या योगदानाला मानवंदना : संघटनेच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर, दि. — ताडाळी एमआयडीसी येथील स्पंज आर्यण कामगार संघटनेच्या वतीने गोपाणी आर्यण पॉवर कंपनीतील सेवानिवृत्त कामगारांचा भव्य सत्कार सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. आयुष्यभर प्रामाणिकपणे सेवा बजावून कंपनीच्या प्रगतीत मोलाचे योगदान देणाऱ्या ज्येष्ठ कामगारांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम सामाजिक बांधिलकीचा आदर्श ठरला.
संघटनेचे अध्यक्ष मा. दिनेशभाऊ चोखारे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमात सेवानिवृत्त कामगारांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. अनेक वर्षे कंपनीच्या प्रगतीसाठी अहोरात्र परिश्रम घेणाऱ्या कामगारांचा सन्मान करणे ही संघटनेची नैतिक जबाबदारी असल्याचे मत अध्यक्ष दिनेशभाऊ चोखारे यांनी व्यक्त केले. कामगारांचे हित, त्यांचा सन्मान आणि त्यांच्या हक्कांचे संरक्षण यासाठी संघटना कायम कटिबद्ध राहील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
या सोहळ्यात गोपाणी आर्यण पॉवर कंपनीतील श्री. दादाजी डोहे, श्री. विजय मसारकर, श्री. अरुण मासरे, श्री. नामदेव देशमुख, श्री. तुळशीदास कांबळे आणि श्री. दिलीप कुक्कुडे या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत करून त्यांच्या दीर्घ सेवेला सलाम केला. सत्कारमूर्तींनी आपल्या सेवाकाळातील अनुभव सांगताना संघटनेने दिलेल्या सन्मानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष श्री. मोहन वाघमारे, महासचिव श्री. संतोष बांदुरकर, कार्याध्यक्ष श्री. तुळशिराम डेरकर, कोषाध्यक्ष श्री. सदाशीव चतुर, सहकोषाध्यक्ष श्री. दशरथ रोगे, तसेच श्री. विजय मोरे, श्री. रमेश आरपेल्ली, श्री. नंदू टोंगे, श्री. सागर कन्नीरवार, श्री. विकास आवारी, श्री. संतोष खोब्रागडे आणि श्री. महेश जुनघरे यांच्यासह संघटनेचे सर्व पदाधिकारी व मोठ्या संख्येने कामगार उपस्थित होते.
कार्यक्रमात उपस्थितांनी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्याकडून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले. संघटनेच्या या अभिनव उपक्रमामुळे कामगारांमध्ये आपुलकी, परस्पर स्नेह आणि सामाजिक उत्तरदायित्वाची भावना अधिक दृढ झाल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले.
कामगारांच्या सन्मानाला सर्वोच्च प्राधान्य देत, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या योगदानाची समाजासमोर दखल घेणारा हा उपक्रम ताडाळी एमआयडीसी परिसरात चर्चेचा विषय ठरला असून स्पंज आर्यण कामगार संघटनेने सामाजिक बांधिलकीचा एक आदर्श निर्माण केल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.



