ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

घुग्घूसमध्ये ८० वर्षीय वृद्ध महिलेवर जीवघेणा हल्ला, लुटीचा प्रयत्न; कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह

चांदा ब्लास्ट

घुग्घूस, चंद्रपूर :- शहरात २ ऑगस्ट २०२६ च्या रात्री घडलेल्या एका धक्कादायक घटनेमुळे महिला सुरक्षेसह शहरातील कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ८० वर्षीय वृद्ध महिलेवर कथित जीवघेणा हल्ला करून लुटीचा प्रयत्न झाल्याने शहरभर संताप आणि भीतीचे वातावरण पसरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमराई वॉर्डातील ८० वर्षीय महिला रविवारी रात्री सुमारे १० वाजता बसस्थानकावरून पायी आपल्या घरी जात होत्या. त्यावेळी एका युवकाने त्यांना घरी सोडण्याचे सांगून दुचाकीवर बसवले आणि स्मशानभूमी परिसरातील निर्जन ठिकाणी नेले. तेथे आरोपीने महिलेवर निर्दयीपणे मारहाण केली, त्यांचे कपडे फाडले आणि अंगावरील दागिने लुटण्याचा प्रयत्न केला.

महिलेचा आरडाओरडा ऐकून परिसरातील नागरिक तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी धाडस दाखवत आरोपीला पकडले आणि नंतर पोलिसांच्या ताब्यात दिले.

या घटनेनंतर शहरातील महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना अधिक तीव्र झाली आहे. काँग्रेस, भाजप, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तसेच विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि नागरिकांनी घुग्घूसमध्ये वाढत्या गुन्हेगारीबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. मोठ्या प्रमाणावर बाहेरील राज्यांतून आलेल्या कामगारांची उपस्थिती, अवैध धंदे आणि अपुरी देखरेख यामुळे गुन्हेगारी वाढत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, शहरातील विविध औद्योगिक भागांमध्ये तसेच इतर अनेक ठिकाणी गांजा, हुक्का आणि एमडीसारख्या अमली पदार्थांची बेकायदेशीर विक्री खुलेआम सुरू आहे. या अवैध व्यवसायांवर वेळीच प्रभावी कारवाई न झाल्यास गुन्हेगारीच्या घटना आणखी वाढू शकतात, अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.

विशेष म्हणजे, या घटनेच्या अवघ्या आठवडाभरापूर्वी एका स्टॅम्प विक्रेत्यावर रात्री हल्ला करून त्याची रोकड लुटण्यात आली होती. त्या घटनेचा तपास पूर्ण होण्यापूर्वीच वृद्ध महिलेवरील हल्ला आणि लुटीच्या प्रयत्नामुळे शहरातील नागरिकांची चिंता आणखी वाढली आहे.

या घटनेचा तीव्र निषेध करत काही लोकप्रतिनिधी आणि सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस निरीक्षकांना निवेदन देऊन आरोपीवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची, शहरातील अवैध धंद्यांवर तातडीने अंकुश आणण्याची तसेच महिला आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

आता संपूर्ण शहराचे लक्ष पोलीस प्रशासनाच्या पुढील कारवाईकडे लागले आहे. गुन्हेगारी आणि अवैध कारवायांवर वेळेत कठोर कारवाई झाली नाही, तर नागरिकांचा कायदा-सुव्यवस्थेवरील विश्वास डळमळीत होऊ शकतो, अशी भावना नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये