वर्धा जिल्हा पोलीस दलातर्फे यशवंत महाविद्यालयात विशेष स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबीर संपन्न
आगामी काळात शाळा-कॉलेजांमध्येही होणार आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वर्धा :- महिला सक्षमीकरण आणि सुरक्षेच्या दृष्टीने वर्धा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. मा. पोलीस अधीक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली, स्थानिक यशवंत महाविद्यालय, वर्धा येथे दिनांक २७ जुलै २०२६ ते २८ जुलै २०२६ या कालावधीत विशेष ‘स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबीर’ यशस्वीपणे संपन्न झाले.
“सुरक्षित रहा, आत्मविश्वासी बना” आणि “स्वतःचे रक्षण, स्वतःचे हात” या ब्रीदवाक्याला सार्थ ठरवत, या शिबिरामध्ये विद्यार्थिनींना विपरित व संकटसमयी स्वतः चे रक्षण कसे करावे, याचे तांत्रिक व प्रात्यक्षिकासह सखोल प्रशिक्षण देण्यात आले.
समारोप प्रसंगी उपस्थित उपस्थितांना मार्गदर्शन करताना मा. पोलीस अधीक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल यांनी सांगितले की, “आधुनिक काळामध्ये महिला व मुलींना शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम बनवणे अत्यंत गरजेचे झाले आहे. स्वसंरक्षणाचे धडे हे केवळ शारीरिक बचावासाठी नसून ते मुलींमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचे एक प्रभावी माध्यम आहे. प्रत्येक विद्यार्थिनीने संकटाच्या वेळी न घाबरता धैर्याने सामना केला पाहिजे.” तसेच, सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिसांच्या हेल्पलाइन क्रमांकांचा वापर करण्याबाबत आणि सदैव सतर्क राहण्याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.
आधुनिक काळात महिला व मुलींना शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी या शिबिरात खालील महत्त्वाच्या बाबींवर भर देण्यात आलाभारतीय न्याय संहिता कलम 34 ते 44 नुसार स्वसंरक्षणाचा कायदेशीर अधिकार मनगट, गळा, मागून पकडल्यास 5 सेकंदात सुटका करण्याच्या प्रात्यक्षिके बॅटन, मिरची स्प्रे तसेच दैनंदिन वस्तूंचा बचावासाठी वापर ऑन-ड्युटी व ऑफ-ड्यूटी वेळी सतर्कता आणि धोका ओळखण्याचे प्रशिक्षण 112 व 1091 या आपत्कालीन हेल्पलाइन क्रमांकांची माहिती या प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांना देण्यात आली शिबिराच्या समारोप कार्यक्रमाला मा. पोलीस अधीक्षक वर्धा श्री. सौरभ कुमार अग्रवाल, प्राचार्य डॉ. विलास ठाकरे यशवंत महाविद्यालय, वर्धा, आर.पी.आय. श्री. शेख माजीद, डॉ. शार्दूल भालेकर शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख, डॉ. सांदीपकुमार रायबोले राष्ट्रीय सेवा योजना – NSS, डॉ. अर्चना दुपारे, डॉ. मंदा ठेंगणे, पोलीस कवायत प्रशिक्षक शिरीन शेख, महिला पोलीस अंमलदार पल्लवी वाघमारे, वैष्णवी भोयर यांच्यासह शिबिराला महाविद्यालयातील २०० हून अधिक विद्यार्थिनीं आणि प्राध्यापक वर्ग उपस्थित होते.
वर्धा जिल्हा पोलीस दलाने या मोहिमेचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी काळात जिल्ह्यातील विविध शाळा आणि महाविद्यालयांमधील मुला-मुलींसाठी अशाच प्रकारच्या विशेष स्वसंरक्षण शिबिरांचे आयोजन पोलीस दलातर्फे केले जाईल.



