प्रा. डॉ. कार्तिक शिंदे “बेस्ट रिसर्चर अवाँर्ड इन फिजिक्स” ने सन्मानित
आंतरराष्ट्रीय रिसर्च इनोव्हेशन इन सायन्स अँड टेक्नॉलॉजी २०२६ परिषद संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
गडचांदूर जि. चंद्रपूर येथील गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळाद्वारे संचालित महात्मा गांधी विज्ञान महाविद्यालयाच्या रसायन शास्त्र व सूक्ष्मजीवशास्त्र विभागाद्वारे आयोजित रिसर्च इनोव्हेशन्स इन सायन्स अँड टेक्नॉलॉजी २०२६ या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये भद्रावती येथील भद्रावती शिक्षण संस्था, भद्रावतीचे सचिव व नीळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. कार्तिक नीळकंठराव शिंदे यांना “बेस्ट रिसर्चर अवाँर्ड इन फिजिक्स” या प्रतिष्टेच्या सन्मानाने सन्मानित करण्यात आले. सदर आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन महात्मा गांधी विज्ञान महाविद्यालय, गडचांदूर गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली, केमिस्ट्री टिसर्च असोसिएशन, मुंबई, अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड माणिकगड सिमेंट वर्क्स युनिट यांचे संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.
प्रा. डॉ. कार्तिक नी. शिंदे यांचे शिक्षण क्षेत्रातील मौलिक संशोधन, योगदान, कौशल्य आणि लौकिक प्राप्त कार्याचा सन्मान करण्यास्तव परिषदेकडून सदर महत्त्वपूर्ण सन्मानाने सन्मानित करण्यात आले. तसेच रिसर्च इनोव्हेशन इन सायन्स अँड टेक्नॉलॉजी २०२६ (आरसीआरआयएसटी २०२६) या आंतरराष्ट्रीय परिषदेचे अध्यक्षपदही प्रा. डॉ. कार्तिक नी. शिंदे यांनी भूषविले. त्यांचे ७१ संशोधन विषयक पत्रिका देशविदेशातील जर्नल्स मध्ये प्रकाशित झालेले असून त्यास संदर्भमूल्य प्राप्त झालेले आहे. ते रा.तु.म. नागपूर विद्यापीठ व गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीचे भौतिकशास्त्र विषयाचे मान्यता प्राप्त मार्गदर्शक आहेत. त्यांचे मार्गदर्शनात ३ विद्यार्थ्यांना आचार्य पदवी प्राप्त वेली आहे. ते लुमिनीसंस सोसायटी ऑफ इंडियाचे सदस्य असून लुमिनीसंस सोसायटी ऑफ इंडिया, विदर्भ रिजन चे अध्यक्ष आहेत. त्यांचे नावे ९ अभिनव पेटंट आहेत. एल. इ. डी. टी. व्हीच्या स्क्रीन संदर्भात विशेष संशोधन कार्य सुरू असून ते अनेक सामाजिक संघटनांशी जूळलेले आहेत. शैक्षणिक कार्यासोबत सामाजिक क्षेत्रातही त्यांचे कार्य अविरत सुरू असते.
या महत्त्वपूर्ण सन्मानाकरिता डॉ. विवेक शिंदे अध्यक्ष, भद्रावती शिक्षण संस्था, भद्रावती, श्रीमती नीलिमाताई शिंदे विश्वस्त, मा. आमदार सुधाकरराव अडबाले, प्रो. डॉ. ढोबळे भौतिकशास्त्र विभाग, रा. तु. म. नागपूर विद्यापीठ, नागपूर डॉ. जयंत वानखेडे, विश्वस्त व माजी प्राचार्य, प्रशांत शिंदे, रवींद्र शिंदे अध्यक्ष, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या. चंद्रपूर, डॉ. एल. एस. लडके, प्राचार्य, नीळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालय भद्रावती, डॉ. सुधीर मोते प्राचार्य, यशवंतराव शिंदे कनिष्ठ महाविद्यालय, भद्रावती यांनी अभिनंदन केले आहे.
या आयसीआरआयएसटी – २०२६ या आंतरराष्ट्रीय परिषदेला देशविदेशातील ख्यातनाम प्राध्यापक तथा संशोधकांनी हजेरी लावली. प्रा. डॉ. सोनिया कार्बीनियो, न्यू युनिव्हर्सिटी ऑफ लिस्बान – पोर्तुगाल, प्रो. डॉ. रामेश्वर अधिकारी, रसायनशास्त्र विभाग, त्रिभुवन युनिव्हर्सिटी, काठमांडू – नेपाळ या विदेशी संशोधकासह प्रो. डॉ. वासुदेव गुरनुले, रसायनशास्त्र विभाग गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली, प्रा. डॉ. आर. के. शुक्ला भौतिकशास्त्र विभाग, लखनौ विद्यापीठ, लखनौ, प्रो. डॉ. ए. एच. हास्मानी, गणित विभाग, सरदार पटेल विद्यापीठ, गुजरात, प्रा. डॉ. ज्योती आर्या सूक्ष्मजीवशास्त्र विभाग, जयपूर युनिवर्सिटी जयपूर, प्रो. डॉ. व्ही.व्ही. गीते रसायनशास्त्र विभाग, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव या मान्यवर संशोधकांसह, मा. श्री. सुभाषभाऊ धोटे माजी आमदार व अध्यक्ष, गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ, गडचांदूर मा. डॉ. प्रशांत बोकारे, कुलगुरू, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली यांचेसह शिक्षण व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन डॉ. शैलेंद्र देव, प्राचार्य, महात्मा गांधी विज्ञान महाविद्यालय व त्यांचे सहकाऱ्यांनी केले. ग्रामीण भागातील महाविद्यालयाने केलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या यशस्वी आयोजनाबद्दल शिक्षण क्षेत्रात डॉ. शैलेंद्र देव व सहकाऱ्याचे कौतुक होत आहे.



