स्व. देवानंदभाऊ कायंदे यांच्या जयंतीनिमित्त आरोग्यसेवेचा महायज्ञ; ८ हजार ७७३ रुग्णांची तपासणी, १७३ जणांचे रक्तदान!
२१ वैद्यकीय विभाग, तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा; दिव्यांगांना कृत्रिम अवयव अन् श्रवणयंत्रांचे मोफत वाटप

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
देऊळगाव राजा : शिक्षणमहर्षी स्वर्गीय देवानंदभाऊ कायंदे यांच्या जयंतीनिमित्त आमदार मनोजभाऊ कायंदे मित्र मंडळाच्या वतीने रविवार, दि. १ नोव्हेंबर २०२६ रोजी देऊळगाव राजा येथील समर्थ शैक्षणिक संकुलात भव्य मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आयोजकांच्या माहितीनुसार, शिबिरात सुमारे ८ हजार ७७३ रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली, तर १७३ रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.
स्व. देवानंदभाऊ कायंदे यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि सेवाभावी कार्याचा वारसा पुढे नेण्याच्या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. केवळ जयंतीनिमित्त अभिवादन न करता त्यांच्या समाजसेवेच्या विचारांना प्रत्यक्ष कृतीतून अभिवादन करण्याचा संकल्प आमदार मनोजभाऊ कायंदे यांनी या उपक्रमातून पुढे आणला. ग्रामीण भागातील सर्वसामान्य आणि गरजू रुग्णांना विविध वैद्यकीय क्षेत्रांतील तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा आपल्या परिसरातच उपलब्ध व्हावी, हा या शिबिरामागील प्रमुख हेतू होता.
शिबिराचे उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्षा तथा संत गजानन महाराज कृषी व शैक्षणिक संस्थेच्या अध्यक्षा नंदाताई देवानंद कायंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार मनोजभाऊ कायंदे, आमदार सिद्धार्थ खरात, माजी आमदार तोताराम कायंदे, संस्थेचे सचिव सतीशभाऊ कायंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. नाझेर काझी, माजी भाजपा जिल्हाध्यक्ष गणेशदादा मान्टे, माजी नगराध्यक्ष देविदास ठाकरे, माजी नगराध्यक्ष संतोष खांडेभराड, नगराध्यक्षा माधुरी तुषार शिंपणे, माजी जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग भुतेकर, भगवानराव मुंडे, गंगाधर जाधव, माजी उपसभापती श्यामभाऊ जाधव, भगवानरावजी खरात, गणेशभाऊ डोईफोडे, हाजी सिद्दिकी शेठ, राजेंद्र डोईफोडे, गटनेते प्रदीप वाघ, लक्ष्मण कव्हळे पाटील, अंबादास खंड, धनशीराम शिपने, दिलीप झोटे, प्रकाश गीते, भानुदास कोल्हे पाटील, सुभाष दराडे सर, खालिद शेठ, नितीन कायंदे, सदाशिव मुंडे, सिद्धार्थ जाधव, श्यामभाऊ मेहेत्रे, अरविंद चव्हाण, दीपक चेके, शेख नझीम यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
२१ वैद्यकीय विभागांतील तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी
या महाआरोग्य शिबिरात मेडिसिन, अस्थिरोग, नेत्ररोग, कान-नाक-घसा, हृदयरोग, बालरोग, त्वचारोग, मूत्ररोग, किडनीविकार, मेंदूविकार, दंतरोग, मुखकर्करोग, स्त्रीरोग, छातीविकार, यकृत व पोटविकार, शस्त्रक्रिया, बालरक्तविकार, फिजिओथेरपी तसेच मुळव्याध व भगंदर अशा विविध वैद्यकीय विभागांतील तज्ज्ञ डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी केली. जालना, छत्रपती संभाजीनगर, देऊळगाव राजा आणि सिंदखेड राजा परिसरातील तज्ज्ञ डॉक्टरांनी या शिबिरात सेवा दिली. रुग्णांना वैद्यकीय सल्ला, आवश्यक तपासण्या आणि मोफत औषधोपचार उपलब्ध करून देण्यात आले.
दिव्यांगांना कृत्रिम अवयव व श्रवणयंत्रांचे वाटप
शिबिराचे विशेष आकर्षण ठरले ते दिव्यांग बांधवांसाठी राबविण्यात आलेले सेवाकार्य. पुणे येथील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या सौजन्याने दिव्यांगांना मोफत कृत्रिम अवयवांचे वाटप करण्यात आले. तसेच कर्णबधिर रुग्णांना श्रवणयंत्रे देण्यात आली. दिव्यांगांना दैनंदिन जीवनात अधिक सक्षमपणे वावरता यावे, या उद्देशाने करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे अनेक गरजू लाभार्थ्यांना मदतीचा आधार मिळाला. शिबिरस्थळी दिव्यांगांसाठी व्हीलचेअरची व्यवस्थाही करण्यात आली होती.
रक्तदानातून सामाजिक बांधिलकी
बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने शिबिरस्थळी स्वतंत्र रक्तदान मंडप उभारण्यात आला होता. या उपक्रमाला तरुणांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत एकूण १७३ जणांनी रक्तदान केले. गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध होण्याच्या दृष्टीने रक्तदानाचे महत्त्व लक्षात घेता, जयंतीनिमित्त राबविण्यात आलेला हा उपक्रम सामाजिक बांधिलकीचा संदेश देणारा ठरला.
रुग्ण व नातेवाइकांसाठी भोजन आणि वाहतूक व्यवस्था
ग्रामीण भागातून येणाऱ्या रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाइकांना कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी आयोजकांनी विशेष व्यवस्था केली होती. बसस्थानकातून शिबिरस्थळी ये-जा करण्यासाठी वाहनांची सोय करण्यात आली होती. शिबिरात सहभागी होणाऱ्या रुग्णांसह भेट देणाऱ्या नागरिकांसाठी मोफत भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. नोंदणी, औषधवाटप आणि विविध वैद्यकीय सेवांसाठी स्वतंत्र स्टॉल उभारण्यात आले होते. देऊळगाव राजा, सिंदखेड राजा आणि जालना येथील डॉक्टर व केमिस्ट असोसिएशनच्या सदस्यांनीही विविध सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य केले.
डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांचे विशेष योगदान
या महाआरोग्य शिबिराच्या यशस्वितेसाठी गजानन काकड, डॉ. राजीव डोईफोडे, डॉ. उमेश मुंडे, डॉ. उमेश डोईफोडे, डॉ. प्रफुल्ल ताठे, डॉ. विलास दराडे, डॉ. अनिरुद्ध मांटे, डॉ. अतुल गीते, डॉ. प्रवीण तिडके आणि डॉ. सांगळे यांनी विशेष परिश्रम घेतले. यासोबतच तालुका आरोग्य विभागाचे सर्व कर्मचारी, जिल्हा रुग्णालय बुलढाणा येथील कर्मचारी, देऊळगाव राजा, सिंदखेड राजा व जालना येथील डॉक्टर असोसिएशनचे सदस्य आणि आमदार मनोजभाऊ कायंदे मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने जबाबदारी पार पाडली.
स्व. शिक्षणमहर्षी देवानंदभाऊ कायंदे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या महाआरोग्य शिबिरातून आरोग्यसेवा, दिव्यांगांना मदतीचा हात, रक्तदान आणि सामाजिक बांधिलकी अशा विविध उपक्रमांचा एकत्रित संदेश देण्यात आला. हजारो रुग्णांनी घेतलेला लाभ आणि रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे हे शिबिर परिसरातील नागरिकांसाठी उपयुक्त ठरले…



