ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शेतात ठेवलेला दोन क्विंटल कापूस चोरट्यांनी पळविला; १८ हजारांचे नुकसान

कापसाच्या सुरक्षेचाही प्रश्न ऐरणीवर! देऊळगाव राजा शिवारात कापूस चोरीची घटना

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

देऊळगाव राजा : शेतात कष्टाने पिकविलेल्या कापसाची वेचणी करून सुरक्षिततेच्या दृष्टीने शेतातील टिनशेडमध्ये ठेवलेल्या कापसावरही आता चोरट्यांची नजर पडू लागली आहे. देऊळगाव राजा शिवारात एका शेतकऱ्याच्या शेतातील टिनशेडमध्ये ठेवलेले कापसाचे सात पोते अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या चोरीत अंदाजे दोन क्विंटल कापूस, ज्याची किंमत सुमारे १८ हजार रुपये आहे, चोरीला गेला आहे. या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

प्राप्त माहितीनुसार, प्रभाकर शंकरराव वाघ (वय ६५, रा. सिव्हील कॉलनी, देऊळगाव राजा) यांची देऊळगाव राजा शिवारात शेती आहे. त्यांनी ३० ऑक्टोबर रोजी सायंकाळी शेतातील कापसाची वेचणी करून तो कापूस सात पोत्यांमध्ये भरला आणि शेतातील टिनपत्र्याच्या शेडमध्ये ठेवला. त्यानंतर ते घरी परतले. मात्र, दुसऱ्या दिवशी ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी शेतात जाऊन पाहिले असता टिनशेडमध्ये ठेवलेले कापसाचे सातही पोते गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

शेतात शोधाशोध करूनही कापसाचा ठावठिकाणा लागला नाही. अज्ञात चोरट्याने संधी साधून टिनशेडमधील सुमारे दोन क्विंटल कापूस चोरून नेल्याचे स्पष्ट झाल्यानंतर प्रभाकर वाघ यांनी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

या तक्रारीवरून देऊळगाव राजा पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) अन्वये कायम गुन्हा क्रमांक ४९३/२०२६ दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक यांच्या आदेशाने या प्रकरणाचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल भास्कर सानप यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही पोलीस हेड कॉन्स्टेबल ज्ञानोबा चमकुरे यांनी केली.

शेतात रात्रंदिवस मेहनत करून पिकविलेला कापूस चोरीला गेल्याने शेतकऱ्याला आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे. या चोरीतील आरोपींचा शोध घेऊन चोरीला गेलेला कापूस हस्तगत करण्याचे आव्हान आता पोलिसांसमोर आहे..

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये