देऊळगाव राजा पोलिसांचा मध्यरात्री गोवंश तस्करीवर छापा! ४२ जनावरांची सुटका; १६.८० लाखांचा मुद्देमाल जप्त
पिकअपमध्ये सहा जनावरांची निर्दयी वाहतूक, कॉटन मार्केटमध्ये ३६ बैल उपाशी! पोलिसांची मोठी कारवाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
देऊळगाव राजा : गोवंशाची कत्तलीसाठी अवैध वाहतूक होत असल्याच्या गुप्त माहितीवरून देऊळगाव राजा पोलिसांनी मध्यरात्री मोठी कारवाई केली. जालना रोडवरील त्र्यंबकनगर परिसरात नाकाबंदी करून बोलेरो पिकअपमधून निर्दयीपणे कोंबून नेण्यात येणाऱ्या चार गायी आणि दोन वासरांची सुटका करण्यात आली. याच प्रकरणाच्या पुढील तपासात देऊळगाव राजा येथील कॉटन मार्केटमध्ये ३६ बैल उपाशीपोटी बांधून ठेवल्याचे आढळून आले. अशा प्रकारे एकूण ४२ गोवंशीय जनावरे पोलिसांनी ताब्यात घेतली असून, बोलेरो पिकअप वाहनासह एकूण १६ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे अवैध गोवंश वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
गुप्त माहितीवरून मध्यरात्री नाकाबंदी
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १ नोव्हेंबर रोजी पहाटे पोलीस कर्मचारी ऋषिकेश बबन चिंचोले हे पोलीस पथकासह गस्तीवर होते. यावेळी पोलीस निरीक्षक ब्रह्मगिरी गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, देऊळगाव राजा कॉटन मार्केटसमोरून जालन्याच्या दिशेने एका बोलेरो पिकअप वाहनातून गोवंशीय जनावरे कत्तलीसाठी नेण्यात येत आहेत.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्र्यंबकनगर, जालना रोड परिसरात नाकाबंदी केली. पहाटे सुमारे २.३० वाजताच्या दरम्यान MH-21-BH-5850 क्रमांकाची बोलेरो पिकअप देऊळगाव राजाकडून येताना दिसली. वाहनाला पिवळ्या रंगाच्या कापडाने मागील बाजूने झाकण्यात आले होते. त्यामुळे पोलिसांना संशय आल्याने त्यांनी वाहन थांबवून तपासणी केली.
वाहनात जनावरांची निर्दयीपणे कोंबून वाहतूक
वाहनचालकासह त्याच्यासोबत असलेल्या व्यक्तीची चौकशी केली असता चालकाने आपले नाव इम्तियाज शेख खलील अहमद (वय ५२, रा. जुना जालना) तर दुसऱ्या व्यक्तीने पठाण फैज खान कुदरत खान (वय १७, रा. मोरंडी मोहल्ला, जालना) असे सांगितले. वाहनात काय आहे, याबाबत विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
त्यानंतर वाहनाच्या मागील बाजूस बांधलेले पिवळ्या रंगाचे कापड उघडून पाहिले असता आतमध्ये चार गायी आणि दोन वासरे अत्यंत दाटीवाटीने व निर्दयीपणे कोंबून भरल्याचे आढळले. या जनावरांना कत्तलीसाठी नेण्यात येत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. जनावरांच्या मालकीबाबत विचारणा केली असता ही जनावरे मोहम्मद रियाज (रा. गोंदेगाव, जि. जालना) यांची असल्याचे सांगण्यात आले.
कॉटन मार्केटमध्ये आणखी ३६ बैल आढळले
चौकशीदरम्यान काही जनावरे देऊळगाव राजा येथील कॉटन मार्केटमध्ये बांधून ठेवल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस पथकाने तेथे धाव घेतली. पाहणी केली असता कॉटन मार्केट परिसरात ३६ नर जातीचे गोवंशीय जनावरे उपाशीपोटी बांधून ठेवल्याचे आढळून आले. अशा प्रकारे पिकअपमधील सहा आणि कॉटन मार्केटमधील ३६ अशी एकूण ४२ जनावरे पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आली.
या जनावरांच्या वाहतुकीसाठी आवश्यक परवाना तसेच खरेदी-विक्रीसंदर्भातील कागदपत्रे संबंधितांकडे आढळून आली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
१६ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त
या कारवाईत पोलिसांनी पाच लाख रुपये किमतीची बोलेरो पिकअप, चार गायींची ८० हजार रुपये किंमत, दोन वासरांची २० हजार रुपये किंमत आणि ३६ बैलांची १० लाख ८० हजार रुपये किंमत, असा एकूण १६ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणी पोलीस कर्मचारी ऋषिकेश बबन चिंचोले यांच्या फिर्यादीवरून देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात कायम गुन्हा क्रमांक ४९५/२०२६ अन्वये प्राण्यांना निर्दयतेने वागणूक प्रतिबंधक अधिनियम १९६० मधील कलम ११(१)(ड), (ई), (एफ), (एच) तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ११९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक ब्रम्हागिरी यांच्या आदेशाने पोलीस उपनिरीक्षक मोहन गिते करीत आहेत. मध्यरात्रीच्या या कारवाईमुळे अवैध गोवंश वाहतुकीचे जाळे उघडकीस येण्याची शक्यता असून, या व्यवहारामागे आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास होणे महत्त्वाचे ठरणार आहे.



