ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भद्रावतीत ‘युवा स्वच्छता अभियान’ उत्साहात संपन्न

क्रीडा संकुल मैदानाची स्वच्छता : युवकांसह विविध सामाजिक व क्रीडा संघटनांचा उत्स्फूर्त सहभाग

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

             युवकांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती निर्माण करण्यासह सार्वजनिक परिसर स्वच्छ व सुंदर ठेवण्याचा संदेश देण्यासाठी भद्रावती येथील क्रीडा संकुल मैदानात रविवारी ‘युवा स्वच्छता अभियान’ उत्साहात राबविण्यात आले.

स्वच्छता अभियानाचे आयोजक सूरज शहा आणि ऋषी वरखडे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित अभियानात विद्यार्थी-विद्यार्थिनी, युवक तसेच विविध सामाजिक संघटनांच्या सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. यावेळी सर्वांनी एकत्रितपणे मैदानाची स्वच्छता करून परिसरातील कचरा गोळा केला व स्वच्छतेचा संदेश दिला.

या अभियानात लता इंदूरकर, नगराध्यक्ष प्रफुल चटकी, माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर, रोटरी क्लब अध्यक्ष सुधीर पारधी , सुयोगभोयर, नगर सेवक अनिल पडोळे, हनुमान घोटेकर यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. तसेच रोटरी क्लब, बॉक्सिंग क्लब, तायक्वांदो क्लब, कबड्डी व अन्य सामाजिक आणि क्रीडा संघटनांच्या सदस्यांनीही सक्रिय सहकार्य केले.

स्वच्छता ही केवळ एका दिवसापुरती मर्यादित नसून ती प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. युवकांच्या सक्रिय सहभागातून समाजात सकारात्मक परिवर्तन घडवून आणता येऊ शकते. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या परिसराची स्वच्छता राखावी आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नये, असे आवाहन आयोजकांनी यावेळी केले.

अभियानाच्या यशस्वी आयोजनासाठी सहभागी विद्यार्थी, सामाजिक संस्था, क्रीडा संघटनांचे सदस्य व सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आयोजकांनी आभार मानले

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये