वनहक्क दाव्यांच्या फेरतपासणीसाठी युवक काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस शिवानीताई वडेट्टीवार यांचा पुढाकार
नामंजूर व प्रलंबित दावेदारांच्या समस्या जाणून घेतल्या; प्रश्न सोडविण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करण्याची ग्वाही

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार
ब्रम्हपुरी :- चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर, ब्रम्हपुरी, सावली आणि सिंदेवाही तालुक्यांतील अनुसूचित जमाती तसेच इतर पारंपरिक वननिवासी नागरिकांच्या वैयक्तिक वनहक्क दाव्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी युवक काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस शिवानीताई वडेट्टीवार यांनी पुढाकार घेतला आहे. यासंदर्भात ब्रम्हपुरी येथील कमलाई निवासस्थानी त्यांनी वनहक्क दावेदार नागरिकांची बैठक घेतली. यावेळी नागरिकांनी आपले नामंजूर व प्रलंबित वनहक्क दावे, कागदपत्रांमधील त्रुटी आणि प्रशासकीय अडचणी मांडत आपल्या समस्या युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस शिवानीताई वडेट्टीवार यांच्यासमोर मांडल्या.
बैठकीत अनेक नागरिकांनी पुरावे उपलब्ध नसणे, वंशावळीत त्रुटी, कागदपत्रांची अपूर्णता तसेच तांत्रिक कारणांमुळे वनहक्क दावे नामंजूर झाल्याचे सांगितले. काही दावेदारांकडे १३ डिसेंबर २००५ पूर्वीचे महसुली अभिलेख, जमीन पट्टे, पी-१, सातबारा, खसरा, अतिक्रमण नोंदवही, वंशावळ आणि ग्रामसभेचे ठराव असे पुरावे उपलब्ध असतानाही दाव्यांचा योग्य विचार झाला नसल्याची तक्रार नागरिकांनी केली. तसेच अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रकरणांमुळे वनवासी कुटुंबांना येणाऱ्या अडचणीही त्यांनी यावेळी मांडल्या.
नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्यानंतर शिवानीताई वडेट्टीवार यांनी वनहक्क दाव्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली.
नामंजूर दाव्यांची गावनिहाय व दावेदारनिहाय यादी तयार करून उपलब्ध पुराव्यांच्या आधारे फेरतपासणी करणे, अपूर्ण कागदपत्रे सादर करण्यासाठी दावेदारांना पुरेसा वेळ देणे, गहाळ झालेल्या दाव्यांच्या मूळ नस्त्यांचा शोध घेणे तसेच प्रलंबित प्रकरणांवर सुनावणी घेणे या बाबींसाठी संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करण्यात येईल. तसेच जिल्हाधिकारी आणि जिल्हास्तरीय वनहक्क समितीच्या माध्यमातून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
वनहक्क हा केवळ जमिनीचा प्रश्न नसून अनेक पिढ्यांपासून जंगलाशी नाळ जोडून जगणाऱ्या वनवासी कुटुंबांच्या हक्काचा आणि अस्तित्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे पात्र वनहक्क दावेदारांना न्याय मिळावा, नामंजूर दाव्यांची योग्य फेरतपासणी व्हावी आणि प्रलंबित प्रकरणांचा लवकर निपटारा व्हावा, यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचे युवक काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस शिवानीताई वडेट्टीवार यांनी बैठकीत सांगितले.



