गीतांजली टॉकीजजवळ चाकूचा थरार! २७ वर्षीय तरुणावर वार; तिघांकडून जीवे मारण्याची धमकी
‘तुलाही मारून टाकू’ म्हणत तरुणावर चाकूहल्ला; देऊळगाव राजा शहरात खळबळ

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
देऊळगाव राजा : शहरातील गीतांजली टॉकीज परिसरात जुन्या वादातून एका २७ वर्षीय तरुणावर धारदार चाकूने हल्ला करण्यात आल्याची घटना ३१ ऑक्टोबर रोजी रात्री आठ वाजताच्या सुमारास घडली. या हल्ल्यात तरुणाच्या उजव्या हाताच्या मधल्या बोटाला दुखापत होऊन रक्तस्राव झाला. याशिवाय आरोपींनी फिर्यादीला जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी दोघांची नावे निष्पन्न झाली असून एका अनोळखी व्यक्तीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, शेख सलमान शेख जहीर (वय २७, व्यवसाय हमाली, रा. रहमतनगर, देऊळगाव राजा) हा ३१ ऑक्टोबर रोजी रात्री शेख अलीम शेख सलीम आणि वसीम शहा उस्मान शहा यांच्यासोबत गीतांजली टॉकीजजवळ उभा होता. यावेळी आयुष सुरेश जाधव (रा. शिवाजीनगर, देऊळगाव राजा) हा रोहित कासारे (रा. रहमतनगर, देऊळगाव राजा) आणि अन्य एका अनोळखी मित्रासह तेथे आला.
यावेळी आयुष जाधव याने सलमानला उद्देशून, ‘तू अक्षय कुकडेला मारण्यासाठी मुले आणली होती,’ असे म्हणत वाद घातला. त्यानंतर आयुषने हातात धारदार चाकू घेऊन फिर्यादीला धमकावले. तसेच रोहित कासारे आणि त्याच्यासोबत असलेल्या अन्य व्यक्तीनेही मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीने तक्रारीत नमूद केले आहे. ‘आम्ही मर्डर केलेले आहेत, तुलाही मारून टाकू,’ अशी धमकी दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
वादाचे रूपांतर हाणामारीत झाले असता आयुष सुरेश जाधव याने हातातील धारदार चाकूने सलमानच्या उजव्या हातावर वार केला. यात त्याच्या उजव्या हाताच्या मधल्या बोटाला जखम होऊन रक्तस्राव झाला. यावेळी सोबत असलेल्या शेख अलीम शेख सलीम आणि वसीम शहा उस्मान शहा यांनी मध्यस्थी करून सलमानची आरोपींच्या तावडीतून सुटका केली. मात्र, तेथून जाताना आरोपींनी फिर्यादीच्या घरी येऊन जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
या घटनेप्रकरणी शेख सलमान याच्या तक्रारीवरून देऊळगाव राजा पोलिसांनी आयुष सुरेश जाधव, रोहित कासारे आणि एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), ३५२, ३५१(२), ३५१(३) आणि ३(५) अन्वये कायम गुन्हा क्रमांक ४९४/२०२६ दाखल केला आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक ब्रह्मा गिरी, पोलीस उपनिरीक्षक मोहन गिते आणि सहाय्यक फौजदार नायबराव मोगल यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक यांच्या आदेशाने पोलीस उपनिरीक्षक मोहन गिते करीत आहेत.
शहरातील सार्वजनिक ठिकाणी झालेल्या या चाकूहल्ल्याच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, आरोपींविरुद्ध पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे..



