वामनपल्ली शाळेतील शिक्षकाची प्रतिनियुक्ती रद्द करा
अन्यथा विद्यार्थ्यांचा शाळाबहिष्काराचा इशारा : पालकांचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
गोंडपिपरी :- तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वामनपल्ली येथील प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात आलेल्या शिक्षकाला तात्काळ मूळ शाळेत परत नियुक्त करावे, अन्यथा विद्यार्थ्यांचा शाळाबहिष्कार करण्यात येईल, असा इशारा पालकांनी गटविकास अधिकारी, पंचायत समिती गोंडपिपरी यांना दिलेल्या निवेदनातून आज ( दि.३ ) मंगळवारी दिला आहे.
निवेदनानुसार, सन २०२५_२६ मध्ये शाळेची पटसंख्या २० होती. तर २०२६_२७ मध्ये ती वाढून २१ झाली आहे. सध्या शाळेत केवळ एकच शिक्षक कार्यरत असून दुसरे शिक्षक अमितकुमार गजानन सारखकर यांची ८ जुलै २०२५ पासून जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, हिवरा येथे प्रतिनियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे एकाच शिक्षकावर सर्व वर्गांचा अध्यापनाचा भार पडत असून मुख्याध्यापकांची प्रशासकीय कामेही त्यांनाच सांभाळावी लागत आहेत. याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर होत असल्याचा आरोप पालकांनी केला आहे.
शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी प्रतिनियुक्तीवरील शिक्षकाला तातडीने वामनपल्ली येथे मूळ पदस्थापनेवर परत नियुक्त करावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
यासंदर्भात ६ ऑगस्ट २०२५ पर्यंत निर्णय न झाल्यास ७ ऑगस्ट २०२५ रोजी शाळेतील एकाही विद्यार्थ्याला शाळेत पाठविणार नाही, असा स्पष्ट इशारा पालकांनी प्रशासनाला दिला आहे. त्यामुळे या मागणीवर शिक्षण विभाग आणि पंचायत समिती प्रशासन काय भूमिका घेते,याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुनीता मडावी, उपाध्यक्ष प्रियांका कोवे, महेंद्र आत्राम, माधुरी कुमरे, दिनकर वेलके, साईनाथ पेंदोर, दीपक कुमरे, पुष्पा कोवे, शालू तलांडे, माधुरी कुमरे, सुवर्णा कोवे, विशाल गेडाम, माजी उपसरपंच साईनाथ कोडापे यांच्यासह शेकडो पालकांची ग्रामस्थांची उपस्थिती होती.



