ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

माविमच्या कार्पेट निर्मितीतून महिलांना शाश्वत रोजगाराची संधी

मूल व सावली येथील कार्पेट निर्मिती केंद्रांना जिल्हाधिकारी वसुमना पंत यांची भेट

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर :_ महिला आर्थिक विकास महामंडळाच्या (माविम) माध्यमातून महिलांना शाश्वत रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने मूल व सावली येथे उभारण्यात आलेल्या कार्पेट निर्मिती केंद्रांना जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी आज (दि. 16) भेट देऊन पाहणी केली. कार्पेट निर्मितीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन उत्पादन क्षमता वाढवावी तसेच ताडोबासारख्या पर्यटनस्थळांवर या उत्पादनांना प्रभावी बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी प्रथम मूल एमआयडीसी येथे स्थापित कार्पेट निर्मिती केंद्राला भेट दिली. येथे कार्पेट विणकाम करणाऱ्या महिलांशी त्यांनी संवाद साधून निर्मिती प्रक्रिया, उत्पादन क्षमता, विक्री व्यवस्था आणि महिलांना मिळणाऱ्या रोजगाराबाबत माहिती जाणून घेतली. मैत्रीण लोकसंचालित साधन केंद्राच्या अध्यक्षा छाया शेंडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे स्वागत करून केंद्राच्या कामकाजाची माहिती दिली.

हाताने तयार करण्यात येणाऱ्या कार्पेटला आधुनिक व अत्याधुनिक उपकरणांची जोड दिल्यास उत्पादन क्षमता वाढण्यास मदत होईल. उत्पादन खर्च नियंत्रित ठेवून आकर्षक आणि दर्जेदार कार्पेटची निर्मिती केल्यास ताडोबासारख्या पर्यटनस्थळांवर त्यांना चांगली बाजारपेठ उपलब्ध होऊ शकते. कार्पेटसोबत आकर्षक कार्पेट फ्रेम्स तयार करण्यावरही भर द्यावा, अशी सूचना जिल्हाधिकारी पंत यांनी केली.

यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी सावली येथे नव्याने बांधण्यात आलेल्या कार्पेट निर्मिती केंद्राची पाहणी केली. या केंद्राचे बांधकाम उत्कृष्ट झाले असून, भविष्यात हे केंद्र कार्पेट निर्मिती व प्रशिक्षणाचे ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ म्हणून विकसित करण्याच्या दृष्टीने नियोजन करावे. या ठिकाणी महिलांना अधिकाधिक प्रशिक्षण देऊन त्यांचे कौशल्य विकसित करावे आणि त्यातून रोजगार व उत्पन्नाच्या शाश्वत संधी निर्माण कराव्यात, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

माविमच्या माध्यमातून महिला बचत गट व लोकसंचालित साधन केंद्रांशी जोडलेल्या महिलांना कार्पेट निर्मितीचे कौशल्य, आधुनिक तंत्रज्ञान आणि प्रभावी विपणनाची जोड मिळाल्यास ग्रामीण महिलांसाठी रोजगाराचे सक्षम माध्यम निर्माण होऊ शकते. स्थानिक उत्पादनांना पर्यटन बाजारपेठेशी जोडल्यास महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणालाही अधिक चालना मिळेल, असे यावेळी सांगण्यात आले.

याप्रसंगी मूलचे उपविभागीय अधिकारी नितीन जाधव, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी प्रदीप काठोळे, सार्वजनिक बांधकाम विभाग, नागभीडच्या उपअभियंता शीतल दामले, मैत्रीण लोकसंचालित साधन केंद्राच्या अध्यक्षा छाया शेंडे यांच्यासह संबंधित अधिकारी, कर्मचारी व कार्पेट निर्मिती करणाऱ्या महिला उपस्थित होत्या.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये