ग्रामपंचायतींनी स्व.उत्पन्नातून गावाचा विकास साधावा
संवर्ग विकास अधिकारी मुक्तेश्वर कोमलवार यांचे आवाहन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
गावाचा गावगाडा चालवायचा असेल तर, ग्रामपंचायतींनी शासनाचे अनुदान, अभियान, उपक्रम, योजना यांवर कायमस्वरूपी अवलंबून न राहता गावस्तरावरील विविध प्रकारच्या करांमध्ये योग्य ती वाढ करून, स्व_उत्पन्नातून गावाचा विकास साधावा, असे प्रतिपादन सावली पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी मुक्तेश्वर कोमलवार यांनी उपस्थित ग्राम पंचायत अधिकारी, सरपंच यांना केले. ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र सिंदेवाहीच्या वतीने “स्व_ उत्पन्न वाढ” या विषयावर आयोजित दोन दिवसीय प्रशिक्षण सत्राच्या समारोपीय कार्यक्रमात ते बोलत होते.
ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्राच्या वतीने पंचायत समिती सावलीच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सभागृहात ग्रामपंचायतचे स्व_उत्पन्न वाढ या विषयावर दोन दिवस (१६ व १७ सप्टेंबर) प्रशिक्षण संपन्न झाले. या प्रशिक्षण सत्रात स्व_उत्पन्न वाढीसाठी स्वतःचे स्रोत, कर आणि करेत्तर स्रोतांचा परिचय, कर निर्मितीतील आव्हाने, वर्तणुकीय विज्ञानाच्या तत्वांचा वापर, गाव विकासासाठी निधी, नाविन्यपूर्ण प्रकल्प, निधीचे पर्याय, शाश्वत संसाधनांसाठी कर अंदाज आणि नियोजन, SWOT विश्लेषण, ग्रामपंचायत विकास आराखड्यात प्रकल्प व्यवस्थापनाची कौशल्ये, स्वामित्व योजना, बांधकाम परवानगी प्रक्रिया यांसारख्या विविध विषयांवर सखोल प्रशिक्षण देण्यात आले.
प्रशिक्षण अधिक सुलभ करण्यासाठी संदर्भ साहित्य, वाचन साहित्य, केस स्टडी, यशोगाथा, PPT, अभ्यासखेळ यांचा योग्य वापर करण्यात आला. ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य गिरीश धायगुडे, व्याख्याता प्रा.पांढरबोढे यांच्या मार्गदर्शनात पार पडलेल्या या प्रशिक्षणासाठी प्रशिक्षक म्हणून ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्राचे गुंतिवार सर आणि यशदा पुणे प्रशिक्षित प्रवीण प्रशिक्षक राजेश डोंगरे यांनी आपली जबाबदारी सांभाळली.
प्रशिक्षणाच्या समारोपीय कार्यक्रम प्रसंगी सहाय्यक गट विकास अधिकारी रवींद्र परिहार, विस्तार अधिकारी राजू परसावार, संजीव देवतळे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. सावली आणि मूल पंचायत समितीच्या ६० ग्रामपंचायत अधिकारी आणि सरपंच यांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतला. खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेल्या या प्रशिक्षणासाठी ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.



