त्रिसरण-पंचशीलाच्या मंगलनिनादात वर्षावास सांगता सोहळा उत्साहात!
दीपस्तंभ बुद्ध विहारात तीन महिन्यांच्या धम्मसाधनेचा मंगलमय समारोप ; बुद्धविचारांच्या आचरणाचा सामूहिक संकल्प

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
गोंडपिपरी :_ भगवान गौतम बुद्धांनी दिलेला समता, करुणा, प्रज्ञा आणि बंधुतेचा विचार समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने गोंडपिपरी येथील इंदिरानगर परिसरातील दीपस्तंभ बुद्ध विहारात आयोजित तीन महिन्यांच्या वर्षावासाचा सांगता समारंभ ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी उत्साहपूर्ण व मंगलमय वातावरणात पार पडला.
त्रिसरण-पंचशीलाचा मंगलनिनाद, बुद्धवंदना आणि धम्मविचारांच्या स्मरणाने संपूर्ण परिसर धम्ममय झाला होता. वर्षावासाच्या कालावधीत तालुक्यातील विविध गावांमध्ये बुद्धवंदना, धम्मदेसना, बुद्ध_भीम गितगायन, धम्मवाचन आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
इंदिरानगर परिसरातील महिलांनी या तीन महिन्यांच्या कालावधीत दररोज सकाळी व सायंकाळी एकत्र येत बुद्धवंदना, धम्मग्रंथांचे वाचन, धम्मगायन आणि उपासनेच्या माध्यमातून धम्मसाधना केली. केवळ धार्मिक विधींपुरती मर्यादित न राहता बुद्धांच्या विचारांचे आकलन, आत्मचिंतन आणि दैनंदिन जीवनात धम्ममूल्यांचा स्वीकार करण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. रविकिरण तावाडे होते. प्रमुख उपस्थितीमध्ये माणिकचंद उराडे, हणमंतू झाडे, वाकडे मॅडम आणि संजीव देवतळे यांची उपस्थिती लाभली. प्रमुख वक्ते म्हणून राजु झाडे आणि प्रवीण रामटेके यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन मोरेश्वर दुर्गे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. आलोक खोब्रागडे यांनी मानले.
यावेळी मार्गदर्शन करताना वक्त्यांनी तथागत गौतम बुद्धांचा धम्म हा केवळ उपासनेचा विषय नसून तो मानवी जीवनाला विवेक, नैतिकता आणि समतेची दिशा देणारा जीवनमार्ग असल्याचे प्रतिपादन केले. अंधश्रद्धा, भेदभाव, विषमता आणि अनिष्ट रूढींपासून दूर राहून वैज्ञानिक दृष्टिकोन, मानवतावादी विचार आणि सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे आवाहन करण्यात आले. बुद्धांच्या शिकवणुकीतील पंचशील, अष्टांगिक मार्ग आणि चार आर्यसत्यांचे महत्त्व समजून घेत त्यानुसार आचरण करण्याची गरजही अधोरेखित करण्यात आली.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवित भोजनव्यवस्थेसह विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. वर्षावासाच्या निमित्ताने निर्माण झालेली सामूहिक धम्मसाधनेची परंपरा आणि महिलांचा सक्रिय सहभाग ही या उपक्रमाची विशेष जमेची बाजू ठरली.
*बुद्धविचारांचा वारसा केवळ स्मरणात नव्हे, तर आचरणात जपण्याचा संकल्प!*
वर्षावासाचा समारोप म्हणजे धम्मकार्याचा शेवट नसून बुद्धविचारांच्या आचरणाची नव्याने सुरुवात आहे, हा संदेश या सोहळ्यातून देण्यात आला. समता, करुणा, प्रज्ञा आणि बंधुता ही मूल्ये वैयक्तिक जीवनासह सामाजिक व्यवहारात रुजवून न्याय्य, विवेकशील आणि मानवतावादी समाजनिर्मितीसाठी प्रत्येकाने योगदान द्यावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. बुद्धविचारांची ही ज्ञानज्योत अखंड तेवत ठेवण्याचा सामूहिक निर्धार व्यक्त करीत वर्षावास सांगता सोहळ्याची सांगता झाली.



