निप्पॉन प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे ६ नोव्हेंबरला काळे झेंडे व दीप प्रज्वलन आंदोलन!
आमदार बच्चू कडू, ॲड. दीपक चटप, मुकेश जीवतोडे यांच्या नेतृत्वात प्रकल्पग्रस्तांचा एल्गार : संपूर्ण प्रकल्पग्रस्तांनी उपस्थितीत राहण्याचे आवाहन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
निप्पॉन प्रकल्पामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासन व संबंधित कंपनीचे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवार, दिनांक ६ नोव्हेंबर रोजी निप्पॉन प्रकल्पाच्या जमिनीवर भव्य आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर काळे झेंडे दाखवून तसेच दीप प्रज्वलित करून प्रकल्पग्रस्त शेतकरी आपल्या मागण्यांसाठी आक्रमक भूमिका मांडणार आहेत.
या आंदोलनाचे प्रमुख नेतृत्व आमदार बच्चू कडू करणार असून, शेतकरी संघटना युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष ॲड. दीपक चटप यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तसेच लोकसभा संघटक मुकेश जीवतोडे यांच्यासह विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने प्रकल्पग्रस्त शेतकरी सहभागी होणार आहेत.
प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या जमिनी, मोबदला, रोजगार, पुनर्वसन आणि अन्यायकारक धोरणांविरोधात आवाज बुलंद करण्यासाठी हे आंदोलन महत्त्वपूर्ण ठरणार आहे. दिवाळीच्या प्रकाशोत्सवातही प्रकल्पग्रस्तांच्या आयुष्यात अंधार कायम असल्याचा निषेध नोंदवत काळे झेंडे आणि दीप प्रज्वलनाच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधण्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
‘आज प्रकल्पग्रस्तांवर अन्याय होत असेल, तर उद्या तुमच्याही हक्कांवर गदा येऊ शकते,’ असा संदेश देत निप्पॉन प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीने समस्त बाधित ग्रामस्थ, शेतकरी, युवक आणि नागरिकांना या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
प्रकल्पग्रस्तांच्या न्याय्य हक्कांसाठी एकजुटीने लढा उभारण्याचा निर्धार या आंदोलनातून व्यक्त होणार आहे.



