राष्ट्रीय व राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांच्या मागण्या सकारात्मकरित्या सोडविणार _ राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर
राज्यस्तरीय शिक्षक संमेलनांचे उद्घाटन संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वर्धा : ‘शिक्षण क्षेत्रात आमुलाग्र बदल घडून आणण्याची ताकद केवळ समर्पित शिक्षकच करू शकतात आणि त्यात राष्ट्रीय व राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा मोलाचा वाटा आहे. महाराष्ट्र राज्याने अंमलात आणलेल्या नवीन शिक्षण पद्धतीत पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा समावेश फार लवकर करण्यात येईल. पुरस्कार प्राप्त शिक्षकांना दोन वेतनवाढी देण्याबाबत आपण मुख्यमंत्र्यांसोबत व शिक्षण प्रशासनसोबत चर्चा करून सकारात्मक निर्णय घेणार आहोत. या सोबतच पुरस्कार प्राप्त शिक्षकांना ‘शासकिय ओळखपत्र’ व त्यांची नावे प्रत्येक जिल्ह्यातिल शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या दर्शनीय भागात लावण्याची कार्यवाही आपण त्वरीत करणार आहोत, असे आश्वासन राज्यमंत्री नामदार डॉ पंकज भोयर यांनी राज्यस्तरीय शिक्षक संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी पुरस्कार प्राप्त शिक्षकांना मार्गदर्शन करताना सेवाग्राम आश्रम परिसरातील नई तालीम ‘शांती भवन’ येथे १ नोव्हेंबर रोजी केले.
उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार रामदास तडस तर उद्घाटक व प्रमुख अतिथी म्हणून शिक्षण राज्यमंत्री तथा वर्धेचे पालकमंत्री नामदार डॉ पंकज भोयर उपस्थित होते. मंचावर अनिल शिवणकर, राज्याध्यक्ष सुभाष जिरवणकर, कार्याध्यक्ष दशरथ शिगारे, राज्य प्रवक्ते सुनील गुरव, राज्य प्रतिनिधी देवेंद्र गाठे व जिल्हाध्यक्ष कॅप्टन मोहन गुजरकर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला निसर्ग सेवा समितीच्या वतीने सेवाग्राम आश्रम परिसरात वृक्षारोपण करून झाली. या प्रसंगी विदर्भ साहित्य संघाचे माजी अध्यक्ष प्रदीप दाते, मुरलीधर बेलखोडे, रंजना दाते व इतर मान्यवर उपस्थित होते.
आपल्या अध्यक्षीय भाषणात माजी खासदार रामदास तडस म्हणाले राज्यातील पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा अनुभव व ज्ञानाचा उपयोग राज्य सरकार करणार असून शिक्षण व्यवस्था अधिक प्रभावी बनविण्याचा प्रयत्न केल्या जाईल.
उद्घाटन कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष कॅप्टन मोहन गुजरकर यांनी करून पुरस्कार प्राप्त शिक्षकांना शिक्षण व्यवस्थेत प्राधान्य देण्यात यावे व शिक्षकांना दोन वेतनवाढी देण्याबाबत सकारात्मक विचार व्हावा, यावर जोर दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ कल्पना लांडगे यांनी तर आभार जिल्हा सचिव डॉ गिरीश वैद्य यांनी केले.



