खा. धानोरकर यांच्या पुढाकाराने माजरी क्षेत्रातील कामगार व महिला कर्मचाऱ्यांचे विविध प्रलंबित प्रश्न मार्गी

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर : माजरी क्षेत्रातील कामगार व महिला कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित आणि अत्यंत गंभीर प्रश्नांसंदर्भात आज कुचना येथील क्षेत्रीय महाप्रबंधक कार्यालयात वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड चे जनरल मॅनेजर राकेश प्रसाद यांच्यासोबत बैठक घेऊन सविस्तर चर्चा करण्यात आली. खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली वेकोली परिसरातील कामगारांच्या हक्कासाठी आणि त्यांच्या मूलभूत सुविधांसाठी प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.
सदर बैठकीत मागील दीड वर्षांपासून प्रलंबित असलेला महिला कर्मचाऱ्यांच्या रविवारच्या (सुट्टीच्या दिवशी ) ड्युटीचा प्रश्न आणि खाण परिसरातील अपुऱ्या रेस्ट शेल्टरमुळे महिला कर्मचाऱ्यांना होणारी गंभीर गैरसोय यावर वेकोली प्रशासनाकडून सातत्याने होत असलेल्या दुर्लक्षाबाबत तसेच अन्यायाबाबत ताकीद देण्यात आली. यासोबतच माजरी क्षेत्रातील सर्व उपक्षेत्रांमध्ये कार्यरत महिला श्रमिकांना रविवारची ड्युटी प्रदान करणे आणि वैकल्पिक कार्यात कार्यरत श्रमिकांची तपासणी करून त्यांनाही रविवार ड्युटीचा हक्क देणे याबाबत प्रशासनाला निर्देश देण्यात आले.
याशिवाय, न्यू माजरी UG २ OC खाणीकडे जाणारा सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक ठरलेला अप्रोच रोड त्वरित दुरुस्त करणे, खाण परिसरात महिलांसाठी बनवण्यात आलेल्या लहान रेस्ट शेल्टरचा विस्तार करून ते सुसज्ज उभारणे आणि श्रमिकांच्या प्रत्यक्ष कार्यस्थळापर्यंत स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय पूर्ण करणे या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली. माजरी क्षेत्रीय रुग्णालयात डॉक्टरांची कमतरता दूर करून तेथे हाडांचे तज्ज्ञ, स्त्री रोग तज्ज्ञ व फिजीशियन यांची तातडीने नियुक्ती करावी किंवा डॉक्टराना प्यानल मध्ये ठेवण्यात यावे. माजरी निवासी संकुलातील घरांची दुरुस्ती व रंगरंगोटीचे काम पूर्ण करावे अशी ठाम मागणी करण्यात आली. तसेच एकोना खाणींमधून उच्च दाबाची ब्लास्टिंग होत असल्यामुळे त्यावर तात्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले.
सदर बैठकी दरम्यान वेकोली प्रशासनाने कामगारांच्या आणि विशेषतः महिला कर्मचाऱ्यांच्या समस्या गांभीर्याने ऐकून घेत, मांडलेल्या सर्व विषयांवर व प्रलंबित मागण्यांवर तातडीने ठोस पावले उचलण्याचे आश्वासन जनरल मॅनेजर राकेश प्रसाद यांनी दिले आहे.



