ग्रामपंचायतीला ‘बालविवाह मुक्त गाव’ प्रमाणपत्रासाठी जिल्हा प्रशासनाचे निर्देश
बालविवाहमुक्त चंद्रपूरच्या दिशेने आशादायी पाऊल.

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे.
गोंडपिपरी :- बालविवाहासारख्या सामाजिक कुप्रथेला कायमचा आळा घालण्यासाठी चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने निर्णायक पाऊल उचलले असून, जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना ‘बालविवाह मुक्त गाव’ घोषित करण्यासाठी व्यापक मोहीम सुरू करण्यात आली आहे.
जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, चंद्रपूर यांनी यासंदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी, तसेच पंचायत समित्यांच्या गटविकास अधिकाऱ्यांना पत्र जारी करून पात्र ग्रामपंचायतींनी ‘बालविवाह मुक्त भारत (BVMB)’ पोर्टलवरून प्रमाणपत्र प्राप्त करून त्याची प्रत जिल्हा कार्यालयात सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
महिला व बाल विकास मंत्रालय, भारत सरकारच्या पुढाकारातून २८ नोव्हेंबर २०२४ रोजी ‘बालविवाह मुक्त भारत’ अभियानाची सुरुवात करण्यात आली. या अभियानाचा उद्देश देशभरातील बालविवाहाच्या घटनांना पूर्णविराम देणे, मुलींच्या शिक्षणाला चालना देणे आणि त्यांचे सुरक्षित, सन्मानजनक व सशक्त भविष्य घडविणे हा आहे.
या अभियानांतर्गत २८ नोव्हेंबर २०२४ ते २८ नोव्हेंबर २०२५ या कालावधीतील कामगिरीचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर २८ नोव्हेंबर २०२५ ते ८ मार्च २०२६ या कालावधीत ‘बालविवाह निर्मूलन विशेष १०० दिवसांची मोहीम’ प्रभावीपणे राबविण्यात आली. या मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर आता पात्र गावांना ‘बालविवाह मुक्त गाव’ प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
जिल्हा प्रशासनाच्या निर्देशानुसार, ज्या ग्रामपंचायतींनी गावात बालविवाह होणार नाही यासाठी प्रभावी जनजागृती, प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि आवश्यक निकषांची पूर्तता केली आहे, अशा ग्रामपंचायतींनी BVMB पोर्टलवरून प्रमाणपत्र प्राप्त करून त्याची प्रत जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयाकडे सादर करावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे, गावात एकाही बालविवाहाची घटना घडल्यास त्या गावाला ‘बालविवाह मुक्त गाव’ प्रमाणपत्र मिळणार नाही, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे ग्रामपंचायत, ग्रामसेवक, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, शाळा, पोलीस, महिला बचत गट, युवक मंडळे आणि सामाजिक संस्थांनी समन्वयाने काम करून बालविवाह रोखण्यासाठी अधिक सजग राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
बालविवाहामुळे मुलींचे शिक्षण अर्धवट राहणे, आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होणे, माता व बालमृत्यूचे प्रमाण वाढणे आणि महिलांच्या सक्षमीकरणावर विपरीत परिणाम होणे यासारखे दुष्परिणाम लक्षात घेता, शासनाने या मोहिमेला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. त्यामुळे प्रत्येक गावाने बालविवाहमुक्त गाव हा मान मिळवण्यासाठी सामूहिक जबाबदारी स्वीकारण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे.
जिल्हा महिला व बाल विकास विभागाच्या या उपक्रमामुळे चंद्रपूर जिल्ह्यात बालविवाहाविरोधातील लढ्याला नवे बळ मिळणार असून, “बालविवाहमुक्त चंद्रपूर _ सुरक्षित, सशक्त आणि शिक्षित बालपण” हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रशासन आणि ग्रामपंचायतींची यंत्रणा अधिक प्रभावीपणे कार्यरत होणार असल्याचे चित्र आहे.



