ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गोंडपिपरी तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा, अन्यथा आंदोलन

मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे काँग्रेसचा इशारा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

गोंडपिपरी :_ तालुक्यात यंदा पावसाचे प्रमाण अपुरे व अनियमित राहिल्याने शेतीपिकांवर मोठा परिणाम झाला असून, गोंडपिपरी तालुका तातडीने दुष्काळग्रस्त घोषित करावा, अशी मागणी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात तालुका काँग्रेसचे अध्यक्ष अशोक दादाजी रेचणकर यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री महोदयांना तहसीलदार, गोंडपिपरी यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले.

गोंडपिपरी तालुका मोठ्या प्रमाणावर शेतीवर अवलंबून असून हजारो शेतकरी धान, कापूस, सोयाबीन, तूर, मका आदी खरीप पिकांवर उपजीविका करतात. मात्र यंदा पावसात मोठे खंड पडल्याने तसेच पिकांच्या वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यावर आवश्यक पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांसमोर गंभीर संकट निर्माण झाले आहे. पावसाची केवळ एकूण आकडेवारी न पाहता पावसातील खंड, जमिनीतील ओलावा, पिकांची सद्यस्थिती व अपेक्षित उत्पादन घट यांचा विचार करून दुष्काळाचे मूल्यांकन करावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.

तालुक्यातील प्रत्येक गावात पर्जन्यमान व पिकांची स्थिती यांचे गावनिहाय वैज्ञानिक सर्वेक्षण करून कृषी व महसूल विभागाच्या संयुक्त पथकांमार्फत प्रत्यक्ष शेतपातळीवर पाहणी करावी. पात्र शेतकऱ्यांना पीक नुकसानभरपाई व दुष्काळी अनुदान द्यावे, पीक कर्जवसुलीस स्थगिती देऊन कर्ज पुनर्गठन करावे, तसेच पीक विम्याची नुकसानभरपाई मिळण्यासाठी विशेष मोहीम राबवावी, अशी मागणी करण्यात आली.

संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन टँकरद्वारे पाणीपुरवठा, आवश्यक ठिकाणी विहिरींचे अधिग्रहण, जलस्रोत संवर्धन तसेच पशुधनासाठी चारा व पाण्याची व्यवस्था करावी. ग्रामीण भागातील रोजगाराचे साधन कमी होण्याची शक्यता लक्षात घेऊन मनरेगा व रोजगार हमीची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू करण्याची मागणीही करण्यात आली.

प्रशासनाने केवळ कागदी अहवालावर अवलंबून न राहता प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या परिस्थितीची पाहणी करावी.

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनातून पाठविलेल्या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन, मोर्चा व जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला.

यावेळी अनुसूचित जाती विभागाचे प्रदेश सचिव ॲड. सचिन फुलझेले, शहराध्यक्ष राजू झाडे, ओबीसी सेल अध्यक्ष महेंद्र कुणघाडकर, अनुसूचित जमाती सेल अध्यक्ष साईनाथ कोडापे, अनुसूचित जाती सेल अध्यक्ष सारनाथ बक्षी, नामदेव सांगडे, अजय माडुरवार, सोनी दिवसे, वनिता वाघाडे, राजू राऊत, शंकर पाल, बालाजी चनकापुरे, संजय झाडे, दिलीप पुलगमकर, शंभू येलेकर, संतोष बंडावार, राहुल लडके, रेखा रामटेके यांच्यासह काँग्रेसचे शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये